पुणे: जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावानेच भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घातला


जुन्नर: जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावानेच भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नात्यामधील दुराव्याने एक बळी घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जुन्नर तालुक्यातील सावरगाव जवळील एकनाथवाडी येथं सोमवारी ही घटना घडली. प्रकाश नामदेव मनसुख (वय-58) असं मृत भावाचे नाव आहे. प्रकाश मनसुख यांच्या अंगावर त्यांचाच चुलत भाऊ आरोपी जयनाथ सोपान मनसुख याने दुपारी 4 वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. गावातील मुख्य चौकात झालेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर प्रकाश मनसुख यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय, पुणे येथे रात्री दाखल केले होते. पण मंगळवारी रात्री उपचारादरम्यान 12.30 वाजेच्या सुमारास प्रकाश मनसुख यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, आज मंगळवारी सकाळी घटनास्थळी जुन्नरचे पोलीस व तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बेदरे यांनी भेट दिली असून आरोपीला व गुन्ह्यात वापरलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MHI 14 HQ 3302 ताब्यात घेतला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. कलम 307,504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी सरपंचाने मागितली डॉक्टराकडे खंडणी, गुन्हा दाखल
दरम्यान, शिक्रापूर (ता.शिरूर)येथील डॉ. रामेश्वर विठ्ठलराव बंडगर यांच्याकडे गावात दवाखाना चालवायचा असेल तर महिन्याला 25 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल नाहीतर दवाखाना चालू देणार नाही, असे म्हणून पैसे मागणाऱ्या शिक्रापुरचा माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
रामेश्वर विठ्ठलराव बंडगर ( वय वर्षे 28, राहणार माळीमळा, शिक्रापूर तालुका शिरूर) हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचा शिक्रापूर गावात दवाखाना आहे. 24 तारखेला शिक्रापूर गावचे माजी सरपंच पहिलवान रामभाऊ सासवडे यांनी रामेश्वर बंडगर यांना आपल्या कार्यालयात बोलावून, ‘तुला शिक्रापूर गावच्या हद्दीत हॉस्पिटल चालवायचे असेल तर महिन्याला 25 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर तुला मी दवाखाना चालू देणार नाही. गावातील लोकांना सांगून तुझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी करायला लावू’ असा दम दिला.
‘गावामध्ये फक्त माझेच राज्य आहे’, अशी धमकी देऊन खंडणीची मागणी केली याबाबत रामेश्वर बंडगर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.