पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच


पुणे: पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीकडून अरुण लाड व श्रीमंत कोकाटे शर्यतीत आहेत. गेल्या दीड दोन वर्षाहून अधिककाळ दोन्ही इच्छुकांकडून पदवीधरांच्या गाठीभेटी, समस्या जाणून घेणे, मतदार फॉर्म भरून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, नियोजन पध्दतीने मतदार नोंदणी केल्याने आता भाजपमध्येही उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे.
पुणे मतदार संघातमध्ये गेल्या (२०१४) निवडणुकीत आघाडीत झालेल्या बंडखोरीमुळे आणि मतविभागणीमुळे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना निसटता विजय मिळाला होता. अत्यंत चुरशीने आणि लक्षवेधी ठरलेल्या निवडणूकीत चंद्रकांत पाटील २ हजार ३८० मतांच्या फरकाने विजयी झाले होते. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील तसेच अरुण लाड दोघांनीही आपला दावा सांगितला होता. यामध्ये सारंग पाटील यांना संधी मिळाली होती. त्यामुळे अरुण लाड यांनी बंडखोरी केली होती. सारंग पाटील आणि अरुण लाड यांच्या मध्ये आघाडीची मते विभागल्यामुळे दोघांनाही पराभव पत्कारावा लागला. अरुण लाड यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नव्हते. शेवटी अरुण लाडही मैदानात उतरले होते. सध्या होवू घातलेल्या निवडणुकीत अरुण लाड सुरुवातीपासून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणूनच पदवीधरांशी संर्पक साधत आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध माध्यमातून त्यांच्या भेटीही घेत आहेत. तर, श्रीमंत कोकाटे हे देखिल पदवीधरांसाठी विविध योजना व विषय घेवून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांनीही राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. दीड दोन वर्षापासून श्री कोकाटे यांनीही पायाला भिंगरी बांधून पदवीधर मतदारांपर्यंत गाठीभेटी सुरु ठेवल्या आहेत.
भाजपमधून पाचजण इच्छुक –
राष्ट्रवादी प्रमाणेत भारतीय जनता पार्टी मधून रथी महारथी उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. त्यात राज्य लोक लेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्यासह राजेश पांडे (पुणे), माणिकराव पाचीव चुयेकर (कोल्हापूर), संग्राम देशमुख (सांगली), शेखर तळेगावकर (सातारा) आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख (सोलापूर) यांची नावे स्पर्धेत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून सुरवातीला सचिन पटवर्धन यांचे नाव आघाडीवर होते. आता पाटील यांचे दुसरे समर्थक राजेश पांडे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे समजते.