पुण्यात बिझनेस पार्टनरनेच आपल्या पार्टनरचा विश्वासघात 95 लाखाची फसवणूक

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील वाघोली येथून ऑगस्ट महिन्यात बिझनेस पार्टनरनेच आपल्या पार्टनरचा विश्वासघात केल्याचा प्रकार समोर आला आहे. दुकानातील साड्या व ड्रेस मटेरियल अशा तब्बल 95 लाख 63 हजार रुपयांच्या वस्तूंचा दुकानातून अपहार करून मित्राचा विश्वासघात केला.
या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनला अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा प्रकरणातील फरार आरोपी सुरेंद्रकुमार सेन याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने नगर येथून अटक केली आहे. आरोपीकडून 42 लाख 81 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने सदर आरोपीला चार नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी नरेंद्रकुमार फुडालिया याच्याकडून लोणीकंद पोलिसांनी काही दिवसांपूर्वी 10 लाख 9 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान, व्यवसाय करताना आपल्या साथीदाराची एवढी मोठी फसवणूक करण्यात आल्याने परिसरात चांगलीच चर्चा रंगली. फसवणूक झालेला व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. मात्र आता आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने सदर व्यक्तीला दिसाला मिळाला आहे.