नदीप्रदूषण करणा-या कंपन्यांवर त्वरीत कारवाई करा – महापौर माई ढोरे


पिंपरी : पिंपरी चिंचवडच्या रावेत बंधारा येथून पाण्याचा उपसा केला जातो. हे पाणी शुद्ध करुन पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांना पुरवले जाते. मात्र या बंधा-यात शहरातील कंपन्यांचे अशुद्घ सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे लाखो मासे मृत झाल्याची माहिती मिळताच महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी महापौर माई ढोरे यांनी आयुक्त श्री. श्रावण हर्डिकर यांना केली आहे.
बुधवारी (४ ऑक्टोबर) रोजी सकाळी रावेत बंधारा येथे भोंडवे लॉन्स जवळ मासे मृत अवस्थेत सापडल्याची माहिती महापौरांना मिळाली. तेथील रहिवासी असलेल्या नागरिकांनी महापौरांना फोन करुन ही माहिती दिली. महापौरांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी हजारो लहान मोठे मासे मृत अवस्थेत आढळले. कंपन्यांचे अशुद्ध पाणी नदीत कोणतीही प्रक्रीया केल्याशिवाय सोडले जात असल्याचे यावेळी पाहणीत समोर आले. या संबंधित कंपन्यांमुळे नदीचे प्रदूषण होत आहे. तसेच हे पाणी नागरिकांच्या जीविताला धोकादायक आहे. त्यामुळे त्वरीत या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे महापौरांनी म्हटले.
रावेत बंधारा येथून उपसा केलेले पाणी प्रक्रीया करुन नागरिकांना पिण्यासाठी वापरले जाते. मात्र या अशुद्ध पाण्यामुळे नदीतील जलचरांच्या जीवाला हानी होत आहे. त्यामुळे पर्यायाने नागरिकांना हा धोका मोठा आहे. यावेळी माजी नगरसेवक गणेश भोंडवे, जवाहर ढोरे आदी उपस्थित होते.