नितीशजींना बिहारची या निवडणुकीत जनता त्यांना निवृत्त करेल- संजय राऊत


नवी दिल्ली : देशात सध्या बिहारची निवडणूक ही सर्वच पक्षांच्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. दरम्यान, बिहारमध्ये अखेरच्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. १६ जिल्ह्यांमधील ७८ जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल टिप्पणी केली आहे.
नितीश कुमार खूप मोठे नेते आहेत. त्यांनी स्वतःचा डाव खेळला आहे. जर एखादा नेता म्हणत असेल की ही त्याची शेवटची निवडणूक आहे. तर त्यांना सन्मानाने निरोप दिला पाहिजे. बिहारची जनता याच संधीची वाट पाहत होती. या निवडणुकीत जनता त्यांना निवृत्त करेल. असे शिवसेना संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, बिहारमध्ये तब्बल २० वर्षानंतर परिवर्तनाचे वारे दिसत आहे. आता केवळ तेजस्वी यादव यांच्याकडून आशा आहेत. विरोधक जंगलराज येईल, अशी टीका करतात. पण देशात सध्या अनेक ठिकाणी जंगलराज चालत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी देखील नितीश कुमार यांच्याबद्दल आज एक विधान केले आहे. या टप्प्यातही लोजपाचे प्रदर्शन चांगले राहील. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की नितीश कुमार हे पुन्हा कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत. तर, राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी लोकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करत म्हटले की, बिहार भविष्याचा निर्णय घेत आहे. नितीश कुमार आता थकले आहेत आणि ते आता राज्याचे नेतृत्व करण्यात असमर्थ आहेत.
तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत मतदारांना मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘बिहार तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान करत आहे. सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून लोकशाही उत्सवात सहभागी होऊन एक नवा रेकॉर्ड करावा. आणि हो मास्क वापरा तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करा’.