कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान

vote-1

पुणे : मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी  आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. कोरोनाच्या सावटाखाली या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया झाली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली होती.

पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण 4 लाख 26 हजार 257 मतदारांनी नोंदणी केली होती. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले. त्याखालोखाल पुण्यात मतदान झाले. पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आणि भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यात प्रमुख लढत झाली. सायंकाळी चार वाजेपर्यंत 2 लाख 11 हजार 96 मतदारांनी मतदान केले होते.चार वाजेपर्यंत पुणे पदवीधरमध्ये 49.52 टक्के मतदान झाले.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात दुपारपर्यंत 8 जिल्ह्यांमध्ये दुपारी 3 पर्यंत 43 टक्के मतदानाची नोंद झाली. औरंगाबादमधून सतीश चव्हाण राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्यासमोर भाजपचे शिरीष बोराळकरांचं आव्हान आहे. भाजपचे बंडखोर उमदेवार रमेश पोकळे यांचा फटका कुणाला बसणार हे पाहावं लागणार आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघात एकूण 2 लाख 6 हजार 454 मतदारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सायंकाळी 4 वाजेपर्यंत 53.64 टक्के मतदान झालं आहे. नागपूरमधून भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत झाली.

शिक्षक मतदारसंघात मतदानाची टक्केवारी अधिक

पदवीधर मतदारसंघाच्या तुलनेत शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची टक्केवारी अधिक राहिली.अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२० सायंकाळी चारपर्यंत 68.65 टक्के मतदान झाले. मतदानासाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. अमरावतीमध्ये एकूण 35622 मतदार आहेत. त्यापैकी सर्वाधिक मतदार अमरावतीमध्ये आहेत. अमरावतीमध्ये प्रमुख लढत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यामध्ये होत आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात सायंकाळी 4 पर्यंत 67 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत आसनगावकर आणि भाजपच्या पाठिंब्यावर जितेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत. 2014 ला विजयी झालेले दत्तात्रय सावंत यांनीही निवडणूक लढवली आहे.

Latest News