शिवसेनेला भोपळा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा -चंद्रकांत पाटील

मुबंई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. या निवडणुकीत भाजपच्या गडांना चांगलाच हादरा बसलाय. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, तिन्ही पक्ष एकत्रित लढल्याने त्यांना विजय मिळाला आणि हे स्वाभाविक होतं. माझे त्यांना नेहमी आव्हान राहील की त्यांनी एकटे लढून दाखवा. मात्र ते एकटे लढणार नाहीत, त्यांच्यात तेवढी हिंमत नाही.
या निवडणुकीत फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा झालाय, शिवसेनेला भोपळा मिळाला. मित्रपक्ष सोबत नव्हता हे खरं आहे. पण मित्राला सोबत राहायचे नसेल तर त्याला आपण काय करणार. कितीही अंतर्गत कुरघोड्या केल्या तरी मित्रपक्ष सोबत असला तर फायदाच होतो. आता आम्ही चिंतन, मनन, परीक्षण, कार्यवाही सगळं करु. आता आम्हालाच ताकद वाढवावी लागेल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.