सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड या लशीच्या तातडीच्या वापरासाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली

सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड या कोरोनावरील लशीच्या तातडीच्या वापरासाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. तसा परवानगीचा अर्ज केल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अदर पुनावाला यांनी ट्विटवरून दिली आहे.
अदर पुनावाला यांनी ट्विटरवरून सांगितलं, “तुम्हा सगळ्यांना शब्द दिल्याप्रमाणे, 2020 साल संपण्याच्या आधीच सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड या मेड-इन-इंडिया लशीच्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीच्या वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगीचा अर्ज केला आहे.”यावेळी अदर पुनावाला यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दलही आभार व्यक्त केले आहेत.
‘फायझर’नेही मागितली भारत सरकारची परवानगी
कालच (7 डिसेंबर) फायझर इंडिया कंपनीने भारत सरकारकडे कोव्हिड-19 विरोधी लशीला आपात्कालीन परिस्थितीत वापरासाठी मान्यता द्या, अशी मागणी केली आहे. फायझर इंडियाने याबद्दल भारतातील औषध नियंत्रकांना (DCGI) पत्र पाठवलं आहे. या पत्रात फायझरने, कोव्हिड-19 विरोधातील लशीची भारतात आयात, विक्री आणि वितरण करण्याची परवानगी मागितली आहे.वृत्तसंस्था PTIनं दिलेल्या माहितीनुसार, “फायझर इंडियाने 4 डिसेंबरला औषध नियंत्रकांकडे (DCGI) कोरोनाविरोधी लशीच्या आपात्कालीन वापरासाठी प्रस्ताव पाठवला आहे.”फायझरने गेल्या आठवड्यात ब्रिटन आणि बहरिनच्या सरकारकडून कोरोनाविरोधी लशीच्या आपात्कालीन वापराची मागणी मिळवली आहे.