एकेदिवशी ED च भाजपाला संपविणार.: धनंजय मुंडे

एकेदिवशी ED च भाजपाला संपविणार.: धनंजय मुंडे
पिंपरी ( प्रतिनिधी ) आपण एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्याच्या सहकाऱ्यापर्यंत जाणं आणि कोणत्याही गोष्टीत ईडीचा वापर करायचा अशा अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. एक दिवस हे ईडीच भारतीय जनता पक्षाला संपवल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वाक्य लिहून घ्या,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमानंतर मुंडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
यावेळी धनंजय मुंडे यांनी जातीयवाचक नावं हटवण्याच्या निर्णयाबाबतही भाष्य केलं. “जी जातीयवाचक नावं सरकारी रेकॉर्डवर आहेत ती पहिले काढली पाहिजेत असा प्रस्ताव आपण समोर आणला. तो प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. त्यानंतर जो नियम केला जाईल त्यात अनेक गोष्टी अंतर्भूत केल्या जातील,” असंही ते म्हणाले.
“शरद पवार यांचं आयुष्य महाराष्ट्राच्या आणि देशातील जनतेच्या विकासासाठी गेलं आहे. ज्या जबाबदारीमध्ये आम्ही आहोत आमच्या विभागामार्फत जनतेच्या उपयोगी योजना त्यांच्यासमोर आणणं सामान्य व्यक्तींचा फायदा होणं ही सर्वात मोठी भेट शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असू शकते,” असंही मुंडे म्हणाले.
भाजपा सरकार शेतकरी विरोधी
“भाजपा सरकार शेतकरी, शेतमजूर कामगारांच्या विरोधातलं आहे. सुरूवातीला विश्वास देण्यात येतं परंतु सत्ते आल्यानंतर तेच सरकार शेतकऱ्यांना शेतमजूरांना पायाखाली तुडवत असल्याचा प्रत्यय आपल्याला येत आहे. केंद्रानं जो कायदा केलाय तो शेतकऱ्यांना संपवणारा कायदा आहे. शेतकरी संपला तर आपला शेतीप्रधान देशही संपेल,” असंही ते म्हणाले. राज्याचा हमीभाव कृषीमूल्य आयोग तयार करून त्याचा प्रस्ताव केंद्रीय कृषीमूल्य आयोगाकडे पाठवतं. हमीभाव ठरवण्याची जबाबदारी केंद्राकडे आहे. ज्यावेळी ‘कन्विन्स’ करता येत नाही तेव्हा भाजपाकडून ‘कनफ्युज’ करण्याचे प्रयत्न भाजपाकडून केले जात असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.