राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर

maharashtra-voter_1571683859-1

पुणे | राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु झाली आहे. 15 जानेवारी 2021 रोजी  34 जिह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार असून त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त यु.पी.एस मदान यांनी केली. तसेच निवडणूक रद्द झालेल्या या ग्रामपंचायतींसह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या निवडणुकांसाठी 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहे. मात्र शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

Latest News