गुजरातमधील अमूल घोटाळ्याप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री विपूल चौधरी यांना अटक

vipuuu

अहमदाबाद – गुजरातमधील अमूल घोटाळा सध्या चर्चेत आहे. कोट्यवधीच्या या घोटाळ्याप्रकरणी काल दूधसागर डेअरीचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे माजी गृहमंत्री विपूल चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी तक्रारदार भगवानभाई चौधरी यांनी विपूल चौधरी यांच्यावर आर्थिक अफरातफर आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करत मेहसाणा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

गांधीनगर सीआयडी क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार दूधसागर डेअरीचे माजी अध्यक्ष विपुल चौधरी, विद्यमान अध्यक्षा आशा ठाकोर, उपाध्यक्ष मेघजी ठाकोर, व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह ३० अधिकाऱ्यांनी मिळून डेअरीच्या १९३२ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त बोनसच्या रूपात सुमारे १५ कोटी रुपये देऊन अर्ध्याहून अधिक रक्कम विपुल चौधरी यांच्या खात्यात जमा केली. मेहसाणा सहकारी दुग्ध उत्पादन संघाचे चेअरमन असताना विपुल चौधरी यांनी २०१३ मध्ये महाराष्ट्रामध्ये सुमारे २२ कोटी रुपयांचा पोषण आहार पाठवला होता.

२०१४ मध्ये सहकारी रजिस्ट्रार यांच्या येथे तक्रार करण्यात आली तेव्हा रजिस्ट्रार यांनी विपुल चौधरी यांनी जानेवारी २०१५ मध्ये एक नोटिस जारी केली होती. त्यावर जुलै २०१८ मध्ये सहकारी ट्र्रिब्युनला स्थगिती देऊन चौधरी यांना ऑक्टोबर २०१८ पर्यंत नऊ कोटी १० लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता.

या प्रकरणी विपुल चौधरी यांनी सांगितले की, दुष्काळादरम्यान महाराष्ट्रात पोषण आहार पाठवणे हा काही भ्रष्टाचार नाही आहे. चौधरींनी केलेल्या दाव्यानुसार सुमारे सव्वा अकरा कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांनी आपली जमीनसुद्धा गहाण ठेवली होती.

दरम्यान, दूधसागर डेअरीची निवडणूक पाच जानेवारी रोजी होणार आहे. विपुल चौधरी पुन्हा एकदा डेअरीचे चेअरमन बनण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र त्यापूर्वीच डेअरीमधील अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Latest News