पुण्यात पोलीस ठाण्यातच महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

गुन्ह्याबाबत चौकशीसाठी बोलाविलेल्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील महिला स्वच्छतागृहातील आरशाची काच फोडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. उज्वला भाऊ चोरगे (वय 30) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई पूजा लोंढे यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याबाबत चौकशीसाठी पोलिसांनी उज्वला यांना पोलीस ठाण्यात बोलाविले होते. त्यानुसार उज्वला रविवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यानंतर लघुशंकेचा बहाणा करत त्या पोलीस ठाण्यातील महिला स्वच्छतागृहात गेल्या. तेथील आरशाची काच फोडून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest News