धानोरी महापालिका हद्दीत बऱ्याच ठिकाणी नाला ‘सोयी’ नुसार कसाही वळवण्यात आलेला आहे

nale

धानोरी – पावसाळी नाल्यांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात रहिवासी बांधकाम प्रकल्प बांधले जात आहेत. बऱ्याच ठिकाणी हा नाला ‘सोयी’नुसार कसाही वळवण्यात आलेला आहे. काही ठिकाणी भराव टाकून नाला बुजविण्यात आला आहे. नाल्यांची दयनीय अवस्था झाली असून, महापालिकेच्या बांधकाम विभाग व अतिक्रमण नियंत्रण विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करत आहे.

धानोरी महापालिका हद्दीत आल्यानंतर हा परिसर झपाट्याने वाढला आहे. पावसाळ्यात दरवर्षी अनेक घरांमध्ये पाणी शिरते. महापालिकेच्या सर्व्हेक्षणानुसार नाला विकसित करण्याचे मार्किंगही काही वर्षांपूर्वी केले होते. त्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करुन संपूर्ण नाला विकसित करण्याचा आराखडाही तयार केला होता. मात्र, काम पूर्ण झालेच नाही. नाला विकसित करताना, जागा मिळेल तसा मार्ग काढून प्रश्‍न ‘वळवण्यात’ आला.

मात्र, काही ठिकाणी जागा मालकांनीच नाल्याची कामे होऊ दिली नाहीत. त्यामुळे ही कामे अर्धवटच आहेत. अधिकाऱ्यांनी पुन्हा नाल्यांच्या कामांसाठी फारशी उत्सुकता दाखवली नाही. नाला रुंदीकरणाचा विचार करता, नियमाप्रमाणे सलग रुंदीचा नाला फारसा कोठेच दिसत नाही. कमी-जास्त रुंदीमुळे पावसाळ्यात नागरिकांना मात्र संकटाचा सामना करावा लागतो.

बांधकाम व्यावसायिकांनी नाल्यावर भराव टाकून कसेही वेडेवाकडे पूल उभारले होते. यातील काही पुलांची महापौर, आयुक्त, नगरसेवकांनी पाहणी करुन कारवाई केली. मात्र, कारवाईत सातत्य दाखवत नाहीत, हे उघड आहे. काही ठिकाणी नाल्यात झाडे पडली आहेत. नालेसफाईची कामेही नियमित होत नाहीत. यामुळे आरोग्याला धोका पोहोचतो आहे.धानोरीत काही ठिकाणी नाले भराव टाकूण बुजवल्याने नागरिकांना पावसाळ्यात अडचणींचा सामना करावा लागतो. नाल्याची रुंदी कमी होऊ नये, यासाठीही अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई करण्याच्या कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
– अनिल टिंगरे, नगरसेवक


नाल्यांमध्ये अतिक्रमणे असल्यास तेथे पुन्हा कारवाई करू. नाल्यातील राडारोडा, भराव काढण्याबाबतचे आदेश संबंधित मालकांना देऊ. बांधकाम प्रकल्प सुरू आहेत, तेथे नियमाप्रमाणे नाला विकसनाची जबाबदारी ही संबंधित व्यावसायिकांचीच आहे. ही कामे नियमाप्रमाणे होतात की नाही, याचीही वांरवार तपासणी करू.
– निळकंठ शिलवंत, शाखा अभियंता, मनपा बांधकाम विभाग

Latest News