शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने 2211 कोटी रूपयांचा निधी मंजुर


मुंबई – नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे महाराष्ट्रात नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने 2211 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे, अशी माहिती विधीमंडळात आज सरकारच्यावतीने देण्यात आली. करोना लसीच्या शीतपेट्यांसाठीही 22 कोटी रूपये मंजुर करण्यात आले आहेत असे सांगण्यात आले आहे.
सरकारच्यावतीने आज विधानसभेत 21992 कोटी 50 लाखांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. त्यावेळी सरकारतर्फे ही माहिती देण्यात आली. सरकारने सन 20-21 सालासाठी ज्या अनुदान मागण्या सादर केल्या त्यात भात उत्पादकांना 2850 कोटी रूपये बोनस स्वरूपात देणे, मराठा आंदोलनाच्या संबंधात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांत वकिलांना फी देण्यासाठी 3 कोटी रूपयांची रक्कम देणे या मागण्याहीं मांडण्यात आल्या.
मुंबईत इंदु मिल मध्ये डॉ आंबेडकर यांचे जे स्मारक उभारले जाणार आहे त्यासाठी सरकारने शंभर कोटी रूपये मंजुर केले आहेत. आमदार निधीसाठी 475 कोटी, नवीन आमदार निवास उभारण्यासाठी 8 कोटी अशीही तरतूद करण्यात आली आहे. या सगळ्या कार्यात आधी मंजूर झालेल्या रक्कमेतील जादा खर्चासाठी या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत.