मोदी सरकारने शेतकऱ्याच्या रक्ताने स्वत:चे हात रंगवून घेऊ नये – राजू शेट्टी


कोल्हापूर | केंद्र सरकारला बळाचा वापर करून शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढायचं आहे. पण सरकारने शेतकऱ्याच्या रक्ताने स्वत:चे हात रंगवून घेऊ नये. तसेच नरेंद्र मोदी यांनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. त्यासाठी त्यांना कायदेशीर ग्वाही दिली पाहिजे. सर्वस्तरातील लोक दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. त्यांना डिवचू नये. केंद्र सरकारचे लक्षण ठिक दिसत नाही. त्यांना हे आंदोलन मोडीत काढायचं आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.
शेतकऱ्यांनी दिल्लीच्या चारही बाजूंना वेढा घातला आहे. लाखो शेतकरी हजारो वाहने घेऊन दिल्लीत आले आहेत. त्यांची दिल्लीतून परत जाण्याची मानसिकता नाही, असं राजू शेट्टींनी सांगितलं. हे आंदोलन कोणत्याही एका पक्षाच्या किंवा संघटनेच्या हातात राहिलेलं नाही. शेतकऱ्यांचा हा रोष कमी करायचा असेल तर कृषी कायदे मागे घेतले पाहिजे, असं शेट्टी म्हणाले