गोळीबार करून पुणे शहरात दहशत पसरविणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक

golibar

पुणे:  जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर गोळीबार करून दहशत पसरविणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त केले आहे. सोन्या कांबळे आणि विशाल सोमवंशी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत

टोळीप्रमुख गणेश पवार याच्या सांगण्यावरून तरुणावर गोळीबार केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून गुंड गणेश पवार आणि त्याच्या टोळीने १० डिसेंबरला सिद्धीक मौला शेख (रा. शनिनगर) यांच्यावर गोळीबार केला होता. कोयत्याने मारहाण करून परिसरात दहशत माजवून पळ काढला होता. भारती विद्यापीठ पोलिस याचा तपास करत होते.

या तरुणावर झालेला गोळीबार हा पवार टोळीतील सोन्या कांबळे आणि विशाल सोमवंशी यांनी केल्याची माहिती पोलिस अंमलदार सर्फराज देशमुख आणि सचिन पवार यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून या दोघांनाही साताऱ्यातील सुरूस फाटा येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, संतोष भापकर, सोमनाथ सुतार, रवींद्र भोसले, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Latest News