मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड


मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड झाली आहे. तर चरणसिंह सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाई जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे नवीन नियुक्त्यांमध्ये मोहम्मद आरिफ नसिम खान यांना प्रचार समितीचे अध्यक्षपद, चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे मुंबईचे प्रभारी पद, प्रिया दत्त, अमिन पटेल, जनेत डिसुझा, उपेंद्र दोशी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची कमान भाई जगताप यांच्या खांद्यावर असणार आहे.
कोण आहेत भाई जगताप?
अशोक जगताप यांना भाई जगताप या नावाने ओळखलं जातं. ते सध्या काँग्रेसच्या तिकीटावर विधान परिषदेत आमदार आहेत. जगताप यांच्या आमदारकीची ही दुसरी टर्म आहे.