गंभीर गुन्ह्यातील आरोपीना मदत केल्याप्रकरणी पिंपरी गुन्हे निरीक्षक राजेंद्र निकाळजे निलंबीत


पिंपरी (प्रतिनिधी )पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी निलंबित केले आहे. वाहन तोडफोडीच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळावा तसेच तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. तसा आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी रात्री उशिरा दिला.
पिंपरी पोलीस ठाण्यात कार्यकरत असलेले गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आणि पोलीस उपनिरीक्षक एस.एस. जाधव असे निलंबित केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यातील एका आरोपीवर खुनाचा प्रयत्न हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी जमीन मिळावा या हेतूने गंभीर गुन्ह्याचे कलम कमी करून किरकोळ कलम लावण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. निकाळजे यांनी पिंपरी न्यायालयात कलम कमी करण्यासाठी अहवाल सादर केला असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे आरोपीची जामिनावर सुटका झाली.
त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक एस.एस.जाधव यांनीदेखील दरोड्याचा गुन्हा दाखल असताना आरोपीवरील कलम कमी होण्याकरिता किरकोळ कलम लावून तसा अहवाल न्यायलायत सादर केला होता. याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांनी त्यांच्याकडे लेखी खुलासा मागवला होता. त्यात ते दोषी आढळले असून त्यांना देखील निलंबित करण्यात आले आहे.