पुणे महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी काढला फतवा….

पुणे : कोणत्याही अधिकाऱ्यांनी माहिती देऊ नये असा फतवा महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी काढला आहे. तसेच माहिती दिल्यास हा प्रकार सेवा नियमालवीचा भंग समजून कडक कारवाई करण्याचा इशाराही डॉ. भारती यांनी या आदेशात दिला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागावर दरवर्षी कोटयावधीचा निधी खर्च केला जातो. या वर्षी करोनाकाळात या खर्चात आणखीनच वाढ झाली असून या विभागास हवा तेवढा निधी देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही आरोग्य व्यवस्था बिघडल्याच जास्त तक्रारी आहेत. तसेच या विभागाच्या ढिसाळ नियोजनाचे अनेक प्रकारही करोनाकाळात वाढलेले दिसून आले आहेत. या शिवाय, गेल्या काही दिवसात लसीकरणाच्या नियोजनाचा गोंधळही दिसून आला आहे. याबाबत काही वृतपत्रांनी हा ढिसाळ कारभार समोर आणल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून तसेच पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य प्रमुखांसह आरोग्य विभागाच्या कामाकाजावरच आक्षेप उपस्थित केला आहे. मात्र, त्यानुसार, आरोग्य विभागाच्या कामकाज सुधारण्या पेक्षा या चूकांचे खापर आपल्या सहकारी अधिकाऱ्यांवर फोडत कोणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये असा फतवा काढला आहे. आरोग्य विभागातील सहायक आरोग्य प्रमुख तसेच इतर अधिकाऱ्यांकडून प्रसार माध्यमांना देण्यात येत असलेली माहिती चूकीची असल्याचा साक्षात्कार पालिकेच्या आरोग्य विभागाला अचानक झाला आहे. या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अर्धवट तसेच अपूरी असते त्यामुळे महापालिकेची बदनामी होते असे कारण देत हा फतवा डॉ. भारती यांनी काढला आहे

Latest News