नांदेडमध्ये ऊसतोड कामगार महिला ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी


नांदेड : जनमत पाठीशी असले की निवडणुका इतिहास घडवतात, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. नांदेड जिल्ह्यातील चिखली हे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मूळ गाव म्हणून जिल्ह्यात परिचित आहे. या गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्पष्ट बहुमत खासदार चिखलीकर यांच्या गटाकडे आहे. मात्र याच गावात खासदारांच्या विरोधी गटांकडून विजयी झालेल्या रेखा बाबुराव गायकवाड यांच्या विजयाची देखील चर्चा होतेय.निवडणूक म्हणजे वारेमाप खर्च असा सगळ्यांचा समज आहे. मात्र नांदेडमध्ये चिखली गावात निवडणुकीत विजयी झालीय. एक नवा पैसा ही खर्च न करता ऊसतोड तोडणाऱ्या रेखा गायकवाड ह्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. व्यवसायाने ऊसतोड कामगार महिला असलेल्या रेखा गायकवाड यांना चिखली गावकऱ्यांनी निवडून दिलंय. विशेष म्हणजे या गावचे सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेला सुटले तर त्या सरपंचपदाच्या एकमेव दावेदार आहेत. निवडणुकीला पैसाच खर्च करावा लागतो, असा समज या उदाहरणामुळे दूर होतो. गावकरी ज्याच्या पाठीशी त्याला नेतृत्व करायची संधी मिळते, हे या निमित्ताने सिद्ध होतंय. एक ऊसतोड कामगार महिला ग्रामपंचायतीत जाऊन आपल्या गावाच्या प्रश्नांना वाचा फोडणार याचा चिखली इथल्या ग्रामस्थांना अभिमान आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या सोमवारी जाहीर झालेल्या निकालावेळी अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळाल्या. असाच एक प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. नांदेड जिल्ह्यातील हाळदा ग्रामपंचायतीमधील दाजी आणि भाऊजींमधील लढत राज्यात चर्चेचा विषय होती. या लढतीत अखेर खासदार प्रताप पाटील-चिखलीकर वरचढ ठरले आहेत.
खासदार चिखलीकर यांचे मेहुणे असलेल्या आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हळदा गावात चिखलीकर गटाची सत्ता आली आहे. हाळदा गावात चिखलीकर गटाने सात जागा जिंकत बहुमत मिळवले. तर खासदार चिखलीकर यांनी स्वतःच्या चिखली ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यातही यश मिळवले. प्रताप चिखलीकर यांच्या गटाने कंधार आणि लोहा तालुक्यातही चांगले यश मिळवले आहे. त्यामुळे दाजी- भावजीच्या लढाईत खासदार चिखलीकर वरचढ झाल्याची चर्चा रंगली आहे.
आमदार श्यामसुंदर शिंदे हे निवडणुकीपूर्वी खासदार चिखलीकर यांच्या गटात होते. मात्र महाविकास आघाडीची सत्ता येताच त्यांनी गट बदलला. तेव्हापासून या दोघांत राजकीय संघर्ष सुरू झाला होता. त्यामुळे हाळदा ग्रामपंचायत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. नांदेड जिल्ह्यात 907 ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला असून मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
माजी आमदार हर्षवर्धन जाधवआणि संजना जाधव या पती-पत्नीचा दारुण पराभव झाला. औरंगाबादमधील पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या या दोघांच्याही पॅनेल्सना पराभवाची धूळ चाखावी लागली. महाविकास आघाडीने हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचा धुव्वा उडवला. पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलला 17 पैकी 4 जागा मिळाल्या, तर संजना जाधव यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीने तब्बल 9 जागांवर विजय मिळवला.