जो बायडन यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाची घेतली शपथ

वाशिंग्टन:. वॉशिंग्टन डीसी येथे हा शपथविधी सोहळा थाटात पार पडला. या शपथविधी सोहळ्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि जॉर्ज बुश हे सपत्निक उपस्थिती होते. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पॉपस्टार लेडी गागा यांनी अमेरिकेचे राष्ट्रगीत गायले.  डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडताच, जो बायडन यांनी ट्विट करत,‘अमेरिकेसाठी एक नवा दिवस’ असल्याचं म्हटलं होतं. या अगोदर जो बायडन यांनी तीनवेळा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवलेली आहे.“हा ऐतिहासिक दिवस आहे, हा लोकशाहीचा दिवस आहे, हा अमेरिकेचा दिवस आहे. आज लोकशाहीच्या मूल्यांचा उत्सव आहे. आज लोकशाहीचा विजय झाला आहे. लोकशाहीचं संरक्षण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. एकजुटीने अमिरेकेच्या विकासासाठी काम करू. अमेरिकेत वर्णभेद संपवण्यासाठी लढा द्यायचा आहे. सगळ्यांच्या विकासासाठी व रक्षणासाठी मी आहे. तसेच, आपल्या सर्वांना करोनाविरोधात देखील लढाई लढायची आहे. ” असं जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणात सांगितलं.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील ट्विट करत जो बायडन यांचं अभिनंदन केलं आहे. “माझे मित्र जो बायडन तुमचं अभिनंदन…ही तुमची वेळ आहे,” असं ट्विट करत ओबामा यांनी सोबत एक फोटोदेखील ट्विट केला आहे.

दरम्यान, या अगोदर व्हाइट हाऊस सोडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना वॉशिंग्टन विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपल्या अखेरच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी कुटुंब आणि मित्रांचे आभार मानले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण कोणत्या ना कोणत्या तरी स्वरुपात पुन्हा परत येणार असल्याचं सूचक विधानही केलं आहे.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणाऱ्या कमला हॅरीस यांनी या अगोदर त्यांनी बायडन यांच्यासमोर देशाला कोरोनासाथीमुळे झालेल्या आर्थिक व आरोग्य परिणामातून बाहेर काढण्याचे आव्हान असल्याचं म्हटलं होतं. तसेच, अमेरिकेत आतापर्यंत ३ लाख ९८ हजार लोक मरण पावले असून, लाखो लोक आर्थिक दुष्टचक्रात सापडले आहेत. आम्हाला बरेच काम करून अनेक आव्हाने पेलायची आहेत, याची आम्हाला जाणीव आहे, असे देखील हॅरीस म्हणाल्या आहेत.बायडेन आज जगातल्या सर्वात शक्तीशाली राष्ट्राचे प्रमुख झाले आहेत. अनेकांना प्रश्न पडला असेल या सर्वात शक्तीशाली आणि श्रीमंत राष्ट्राच्या प्रमुखांचा पगार किती असेल? त्यांचा पगार ऐकून सर्वांना धक्का बसू शकतो. कारण बायडेन यांना दरवर्षी तब्बल 400000 डॉलर्स (2 कोटी 94 लाख 19 हजार रुपये) वेतन म्हणून मिळणार आहेत. हे वेतन भारताच्या राष्ट्रपतींपेक्षा 5 पटीने जास्त आहे.

अमेरीकन राष्ट्राध्यांना वेतनासह वेगवेगळे तब्बल 17 भत्तेदेखील दिले जातात. त्यांना खर्चासाठी 50000 डॉलर (36 लाख 77 हजार रुपये), प्रवास खर्च म्हणून 100000 डॉलर (73 लाख 54 हजार रुपये) आणि मनोरंजन भत्ता म्हणून 19000 डॉलर (13 लाख 97 हजार रुपये) दिले जातात. यासोबत अजून 14 भत्ते दिले जातात. यासोबतच विद्यमान आणि माजी राष्ट्राध्यक्षांना सुरक्षा आणि आरोग्य विमा, वॉर्डरोब बजेटही दिलं जातं.

Latest News