रेणू शर्माचा मोठा खुलासा

मुंबई : रेणू शर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये अनेक बाबींचा खुलासा केला आहे. धनंजय आणि त्यांच्या द्वितीय पत्नी करुणा (रेणू यांची बहिण) यांच्यात मतभेद असून त्यावरून न्यायालयात केसही सुरू आहे. त्यामुळे मी मानसिक तणाव आणि दबावाखाली होते, असे रेणू यांनी म्हटले आहे. एका मोठ्या राजकीय षडयंत्राची मी शिकार होत असल्याची जाणीव मला झाली होती. काही लोक माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय यांना लक्ष्य करत होते आणि हे चुकीचे असल्याचे मला समजत होते. या प्रकरणात मी घरातील कोणत्याही व्यक्तीचे नाव घेत नाही. कारण मला घरातील मंडळींशी नाते खराब करायचे नाही. धनंजय यांच्याविरुद्धची तक्रार मी पूर्णपणे मागे घेत आहे.सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्धची बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे मुंडे यांच्यावरील राजकीय आणि कायदेशीर संकट टळले आहे. या साऱ्या प्रकारावर खुद्द रेणू शर्मा यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. ही तक्रार आपण का दिली, या मागचे कारण एका चिठ्ठीद्वारे ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, रेणू शर्मा यांच्यावर प्रचंड दबाव असल्याने त्यांनी माघार घेतल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे

धनंजय यांनी मला कधीही लग्नाचे वचन दिले नव्हते की बलात्कार केला नव्हता, असेही त्यांनी यात म्हटले आहे. त्याबद्दलचे कसलेही फोटो किंवा व्हीडओ नाहीत. कारण असे कधी घडलेच नव्हते. त्यामुळे मुंडे यांच्याविरुद्ध माझी कोणतीही तक्रार नाही आणि मी हा खुलासा पूर्णपणे शुद्धीत करत आहे, असेही शर्मा यांनी शेवटी म्हटले आहे.शर्मा यांनी केलेल्या आरोपामुळे मोठे वादळ उठले होते. धनंजय यांनाही आपले दुसरे लग्न झाले असून दोन मुले असल्याचे जाहीरपणे सांगावे लागले होते. मुंडे यांच्य राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. मात्र त्यातून ते सहीसलामत सुटल्याचे दिसून येत आहे. दोन मुलांची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपविल्याबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Latest News