2 महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा प्रलंबित:संजय राऊत

मुंबई : “महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश आहे. करुणेचा उगम हा महाराष्ट्रातूनच झाला. कदाचित म्हणूनच राज्यपालांना महाराष्ट्रात रमावं वाटत असेल. आमचे राज्यपाल करुणेचा सागर आहेत. याच करुणा भावनेने त्यांनी कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी. 12 राज्यपाल नियुक्त सदस्य त्यांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवले आहेत. ते त्यांनी मोकळे करावेत.”मुंबईत संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टोला लगावला आहे

याचबरोबर, राज्यपाल नियुक्त आमदार मोकळे केले तर राज्यपालांच्या मनात घटनेविषयी करूणा आहे, हे देशाला समजेल,असा टोलाही यावेळी संजय राऊत यांनी लगावला. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित पडला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे,

राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झाले आहे. विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या 12 आमदरांच्या नावाला राज्यपालांनी अद्याप मंजुरी न दिल्याने अधिवेशनात काल या मुद्द्यावरुन राजकारण तापले. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनाचे कामकाज सुरु होताच मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिले.


महाविकास आघाडीचे सरकार विदर्भ विकास महामंडळ झाले पाहिजे या मताचे आहे. ते झालेच पाहिजे याबाबत सरकारचे दुमत व्हायचे कारण नाही. पण कॅबिनेटने एक निर्णय घेतला आहे. ज्यावेळी राज्यपालांकडे पाठवलेली 12 नावs जाहीर होतील त्यादिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळ आम्ही स्थापन करणार आहोत, असे अजित पवारांनी म्हटले आहे. तसेच, बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे, असेही अजित पवार म्हणाले.