पुणे : आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह चळवळीतीतील अग्रणी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, सुगावा प्रकाशनचे सर्वेसर्वा आणि फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे अग्रदूत प्रा. विलास वाघ (वय ८३) यांचे गुरुवारी (ता.२५) पहाटे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांना करोनाची लागण झाली होती .त्यांच्या पार्थिवावर कोरोना प्रोटोकॉलनुसार कात्रज (पुणे) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी प्रा. उषा वाघ आणि परिवर्तनवादी चळवळीतील मोठा परिवार आहे. त्यांचा जन्म १ मार्च १९३९ रोजी झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मागोवा घेत त्यांनी स्वत:ला समाजप्रबोधनाच्या चळवळीत झोकून दिले होते.