उस्मानाबाद सरकारी रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघड…

images-1

उस्मानाबाद:: सरकारी रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेड शिल्लक असतानादेखील खुर्चीवर बसवून ऑक्सिजन दिला जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या प्रकारामुळे वृद्ध रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी 681 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सध्या चार हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केंद्राकडून पाठवण्यात आलेल्या विशेषतज्ञांच्या पथकानंही येथील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्राशिवाय छत्तीसगड, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांतूनही कोरोनाची 80.92 टक्के प्रकरणं समोर येत आहेतदेशात कोरोना  रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. यात महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. केवळ कोरोना रुग्णांची संख्याच नाही तर राज्यातील रुग्णालयांची  स्थितीदेखील भयंकर आहे.

रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होत असतानाच रुग्णालयांमध्ये बेडची मोठी कमतरता जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत अनेक रुग्णांना खुर्चीवरच ऑक्सिजन पुरवला जात असल्याचं भयंकर चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात रविवारी कोरोनाचे आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. रविवारी 63,294 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर आता एकूण बाधितांची संख्या वाढून 34,07,245 झाली आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये स्थिती गंभीर – केंद्रीय पथकाच्या म्हणण्यानुसार, औरंगाबाद , नंदुरबार, यवतमाळ, सातारा, पालघर, जळगाव आणि जालना या जिल्ह्यांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. यातील तीन जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची भरपूर गर्दी आहे. याशिवाय तीन जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठा कमी आहे. दोन जिल्ह्यांमध्ये व्हेंटिलेटर खराब आहेत. अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर आणि नंदुरबारमध्ये रुग्ण मोठ्या संख्येत रुग्णालयांमध्ये आहेत.

Latest News