पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने धुमाकूळ, ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा


पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या शहरात रोज दोन ते तीन हजार इतक्या पटीने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शहरातील खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह अहमदनगरमध्ये आज रात्रभर पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. राज्यात होत आहेकोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ. तर दुसरीकडे पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर या ठिकाणी ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणच्या कोरोना रुग्णांचा श्वास गुदमरला आहे. तसेच या ठिकाणी ऑक्सिजनचा खूप कमी साठा शिल्लक असल्याने खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळत नसल्याचेही बोललं जात आहे.
पिंपरी चिंचवड शहरात शंभरपेक्षा अधिक खाजगी कोविड रुग्णालय आहेत. त्यामध्ये साधारणपणे 2300 रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. मात्र काल दुपारपासून या ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले आहे. पुणे अन्न आणि औषध प्रशासनाकडे याबाबत वारंवार संपर्क करुनसुद्धा ते याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप भाजप आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.
जर या शहरात हीच परिस्थिती राहिली, तर अनेक रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होईल. तसेच नातेवाईक संतप्त होऊन उद्रेक होईल. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी शहरातील खाजगी रुग्णालयांना पोलीस बंदोबस्त पुरवावा, अशी मागणी महेश लांडगे यांनी केली आहे.
पुणे शहरात काल दिवसभरात 5 हजार 138 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 6 हजार 802 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात दिवसभरात 55 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या 52 हजार 977 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील 1 हजार 277 जणांची प्रकृती गंभीर आहे.
कालच्या आकडेवारीनुसार पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 76 हजार 962 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 3 लाख 17 हजार 767 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 218 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोना स्थिती
काल दिवसभरात राज्यात तब्बल 62 हजार 97 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 519 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात काल 54 हजार 224 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील स्थिती अधिकाधिक चिंताजनक बनत आहे.
कालच्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या 6 लाख 83 हजार 856 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 39 लाख 60 हजार 359 वर पोहोचली आहे. तर त्यातील 32 लाख 13 हजार 464 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 61 हजार 343 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात सध्या 38 लाख 76 ङजार 998 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 27 हजार 690 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.