…नाहीतर पुण्याला नवा पालकमंत्री द्या…


पुणे | अजितदादांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह नाही. ते सक्षम आहेत. मी त्यांचं नेहमीच कौतुक केलं आहे. ते सकाळी 7 वाजताच मंत्रालयात जातात. बाकीच्या मंत्र्यांचा दिवस 11 वाजता सुरू होतो. हे मंत्री 11 वाजेपर्यंत फोनही उचलत नाहीत. अजितदादांवर कामाचा लोड आहे. त्यामुळे त्यांनी पुण्यातून राज्य चालवावं किंवा पुण्याला नवा पालकमंत्री द्यावा. त्यांनी पुण्यातून राज्य चालवल्यास ते लोकांना सहज उपलब्ध होतील, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.दोन दिवसांपूर्वी चंद्रकांतदादांनी अजित पवारांना झोप कमी करा आणि पालकमंत्रीपद सोडा असा सल्ला दिला होता. त्यावर आरोप करणाऱ्यांचा हेतू आणि मेंदू तपासा, अशी टीका अजित पवारांनी केली होती.
अजितदादांवर कामाचा ताण आहे. त्यामुळे त्यांनी एकतर राज्य पुण्यातून चालवावं किंवा पुण्याला नवा पालकमंत्री द्यावा, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना डिवचलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते..दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती, असा टोला अजित पवारांनी पाटलांना लगावला होता.