मोफत लसीकरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब ,मी तर सही केली-अजित पवार

पुणे ( प्रतिनिधी ) राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात लसींचा तुटवडा आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावेत म्हणून आम्ही उत्पादकांशी चर्चा करत आहोत. परंतु, भारत सरकारने प्रत्येक राज्यासाठी रेमडेसिवीरचा कोटा ठरवून दिला आहे. त्यामुळे उत्पादक कंपन्या महाराष्ट्राला अधिक साठा देता यावा म्हणून केंद्राशी चर्चा करत आहे. तसेच आम्ही रेमडेसिवीरसाठी ग्लोबल टेंडर काढणार आहोत. आपल्याकडे आठ दहा कंपन्या आहेत. मात्र, त्या पुरेसा साठा देऊ शकत नाहीत. त्यामुळे ग्लोबल टेंडर काढणार आहोत. सर्व प्रक्रिया पूर्ण करून केंद्र सरकारची परवानगी घेऊनच पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे संकेत दिले आहेत. मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर सही करण्यात आली आहे. उद्या कॅबिनेटची बैठक होणार आहे. त्यात सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल, असं पवार म्हणाले.

मोफत लसीकरणावर मी आज थेट काही भाष्य करू शकत नाही. बैठकीला अवघे 24 तास बाकी आहेत. तोपर्यंत कळ सोसा. आज मी काही भाष्य केलं आणि उद्या कॅबिनेट चर्चेच्या अनुषंगाने आणखी वेगळा प्रस्ताव आला तर अजित पवारांची मागणी फेटाळली, अशी ब्रेकिंग न्यूज तुम्हीच कराल. त्यामुळे थोडावेळ थांबा, असं त्यांनी सांगितलं.मोफत लसीकरणाबाबत केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे माहीत नाही.

45 वर्षाच्या पुढील नागरिकांना लस देण्याचं सरकारचं म्हणणं आहे. केंद्राची नक्की भूमिका कळत नाही. मात्र, वेळ आल्यास आम्हीच निर्णय घेऊ, असं सांगतानाच महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. आर्थिक भाराचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.राज्यात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याच्या प्रस्तावावर मी सही केली आहे. उद्या हा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीत येणार असून त्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असं सांगतानाच आर्थिक भाराचा कोणताही निर्णय मुख्यमंत्रीच घेत असतात, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे उद्या बुधवारीच मोफत लसीकरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळत आहेत.

यावेळी त्यांनी खासदार सुजय विखे पाटील यांना टोला लगावला. काही लोकांचे विमानात बसलेले फोटो पाहिले. त्यांच्यासोबत बॉक्सही पाहिले. असा अतिरेक होऊ नये. प्रत्येकानं नियमांचं पालन करायला हवं. मी केवळ सुजय विखे यांचं उदाहरण दिलं आहे. कारण त्यांचे व्हिडीओ व्हायरल जाले आहेत. कोर्टानेही त्यावर मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे त्यांचं उदाहरण दिलं. मात्र हा नियम सर्वांनाच लागू पडतो. मग सत्ताधारी असो की विरोधक सर्वांनी संयमाने वागलं पाहिजे. ही महामारी मोठं संकट आहे, त्यावर संयमाने भूमिका घ्या, असं आवाहन त्यांनी केलं.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने केलेल्या कारवाईवरही त्यांनी भाष्य केलं. या प्रकरणात उच्च न्यायालयाने काय निर्णय दिले हे नीटपणे पाहिले पाहिजे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे आमच्या सारख्या ज्येष्ठांनी तरी त्यावर भाष्य करू नये. या गोष्टींचं भान ठेवायला हवं, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच या प्रकरणावर अधिक बोलण्यास नकार दिला.