आज लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील?

मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रकोप सुरूच आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील रुग्णसंख्या स्थिर आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे या महानगरांतील रुग्णसंख्या किंचित घटली आहे. तथापि, नाशिक, नागपूर जिल्ह्यांतील रुग्णसंख्येचा आलेख कायम चढता आहे.एकीकडे मुंबई, पुणे या शहरी भागातील रुग्णसंख्या घटली असली तरी ग्रामीण महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असल्याचे चित्र आहे.महाराष्ट्रात 12 फेब्रुवारीनंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. मागील 10 आठवड्यांत म्हणजेच अडीच महिन्यांत महाराष्ट्रातील तब्बल 23 लाखांच्या घरात नागरिकांना संसर्गाची बाधा झाली. सुरुवातीला ही लाट पुणे, मुंबईत आली. त्यानंतर ठाणे, नाशिक, नागपूर आदी शहरांत वाढत गेली. आता मुंबई, ठाणे, पुण्यात रुग्णसंख्या घटू लागली आहे.
मात्र नाशिक व नागपूरसह उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढ कायम आहे. पुणे, मुंबई, ठाणे शहर व परिसरातील रुग्णसंख्या कमी होण्यामागे अथवा लाट ओसरण्यामागे 14 एप्रिलपासून लावण्यात आलेली संचारबंदी, कडक निर्बंधाचा सकारात्मक परिणाम असल्याचे बोलले जाते. कारण ही शहरे दाट लोकसंख्येची आहेत. लोकांची वर्दळ कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली असा प्राथमिक निष्कर्ष काढला जात आहे.महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाची गंभीर स्थिती पाहता सरकारसमोर पुढील काही दिवस सुरू असलेला कडक लॉकडाऊन वाढविण्याशिवाय पर्याय नाही. तसे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज बोलून दाखविले. त्यामुळे 1 मेपर्यंत असलेला लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढविला जाण्याचे संकेत आहेत. याबाबत बुधवारी होणार्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांतील रुग्णसंख्येचा चढता आलेख कायम आहे. दिलासादायक बाब म्हणजे या दोन्ही शहरांतील रुग्णवाढीच्या दरात मागील आठवड्यापासून किंचित घट झाली आहे. त्यामुळे आगामी 10-12 दिवसांनंतर नाशिक आणि नागपूरमधील रुग्णसंख्या घटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर आदी पाच प्रमुख शहरे, जिल्हे वगळता उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रात मार्चअखेरपर्यंत मर्यादित रुग्णसंख्या होती. मात्र एप्रिल महिन्यात ग्रामीण महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महानगरांत रुग्णसंख्या घटल्याने फायदा झाल्याचे दिसते, तर उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रात याचा फायदा 10 ते 15 मेनंतर दिसेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील दुसर्या लाटेतील रुग्णसंख्या व सद्यस्थिती पाहता राज्यात आणखी किमान 10 ते 12 दिवस लॉकडाऊनसदृश कडक निर्बंधांची गरज भासते. महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री ठाकरे हे राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. त्यावेळी राज्यातील लसीकरण मोहिमेबाबत आणि कोरोना परिस्थितीबाबत भाष्य करणार आहेत. राज्याची सद्यस्थिती पाहून मुख्यमंत्री महाराष्ट्रात 10 मेपर्यंत कडक निर्बंध वाढविण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील दुसर्या लाटेचे सद्यस्थितीतील निष्कर्ष काय सांगतात?
राज्यातील पाच प्रमुख शहरांत 60 टक्के रुग्ण
दुसर्या लाटेतील महाराष्ट्रातील रुग्णसंख्या : 22 लाख 90 हजार 822
दुसर्या लाटेतील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व नागपूर जिल्ह्यांतील रुग्णसंख्या : 13 लाख 69 हजार 306. (राज्यांच्या एकूण रुग्णसंख्येच्या 60 टक्के)
दुसर्या लाटेतील उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रातील रुग्णसंख्या : 9 लाख 21 हजार 516. (राज्यांच्या एकूण रुग्णसंख्येच्या 40 टक्के)
लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील
राज्यातील लॉकडाऊन वाढविण्याचे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुण्यात दिले. लॉकडाऊन वाढण्याचे संकेत काही मंत्र्यांनी दिले आहेत. त्यासंदर्भात विचारले असता, उद्या (बुधवारी) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होत असून या बैठकीनंतर मुख्यमंत्री त्यासंदर्भातील निर्णय जाहीर करतील, असे जयंत पाटील म्हणाले. 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्यासंदर्भातील निर्णयही या बैठकीनंतर मुख्यमंत्रीच जाहीर करतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.