पिंपरीशहरातील कोरोना लस संपल्याने लसीकरण थंडावले


पिंपरी चिंचवड | कोरोनाची रुग्णवाढ रोखण्यासाठी लसीकरण वाढविण्यावर भर देण्याचे सांगितले जाते. मात्र, लशीची टंचाई असल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.शहरात एकूण 100 पेक्षा जास्त ( महापालिका 60 आणि खासगी – 29 ) लसीकरण केंद्रामधून नागरिकांना लस देण्याचे काम सुरू होते. परंतु, लशीचा साठा कमी असल्याने अनेक केंद्रे बंद करावी लागली आहेत.पिंपरी- चिंचवड शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा जवळपास संपुष्टात आला आहे. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत. सकाळी काहीवेळ फक्त 12 केंद्रांवर लसीकरण झाले. लस संपल्याने तिथेही लसीकरण थंडावले आहे. दोन दिवसांपासून महापालिकेला लस उपलब्धच झाली नाही.तर, दुसरीकडे महापौर उषा ढोरे नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करत आहेत. लसच नाही, तर लस कशी टोचवून घ्यायची, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
केंद्रामध्ये दिवसेंदिवस घट होत चालली आहे. लशीची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. नागरिकांना लसीकरण केंद्रांवरून परत जावे लागत आहे. अनेक जेष्ठ नागरिकांचे दुसरा डोस बाकी आहे. ते लस घेण्यासाठी जातात. पण, त्यांना लस मिळत नाही. त्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत.महापालिकेची दहा दिवसांसाठी दीड लाख डोसची मागणी असते. पण, सलग दोन दिवस महापालिकेला लस मिळालीच नाही. कालपर्यंत शहरातील 3 लाख 79 हजार 280 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.
त्यात 45 आणि 60 वर्षापुढील 3 लाख 62 नागरिकांनी लस घेतली आहे. मंगळवारी 64 महापालिका केंद्रावर 8 हजार 697 आणि 27 खासगी केंद्रावर 2 हजार 173 अशा एकूण 10 हजार 870 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते.लस उपलब्ध नसल्यामुळे आज मर्यादित क्षमतेसह केवळ 12 लसीकरण केंद्रे सुरू ठेवली होती. या 12 केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. लशीचा साठा संपल्याने दुपारनंतर तेथील लसीकरणही थंडावले. परिणामी, लसीचा साठा संपल्याने शहरातील लसीकरण ठप्प झाल्याचे पहायला मिळाले.
महापालिकेच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रमुख डॉ. वर्षा डांगे म्हणाल्या, “लशीची कमतरता आहे. लस उपलब्ध नसल्याने अनेक केंद्रे बंद आहेत. शासनाकडून लस मिळाली नाही. जेवढे डोस उपलब्ध होते. त्यानुसार लसीकरण केले. आज 12 लसीकरण केंद्रे चालू होती. ती सुद्धा पूर्ण क्षमतेने चालू नव्हती. लशीचे डोस थोडावेळ पुरतील एवढेच होते. शासनाच्या उपसंचालक कार्यालयाकडे मागणी नोंदवली आहे. पण, तेथून सलग दोन दिवस डोस मिळालेच नाहीत. महापालिकेची दहा दिवसांसाठी दीड लाख डोसची मागणी असते. पण, मागणीनुसार लस मिळाली नाही”.