बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवणं सोपं नाही- संजय राऊत

मुंबई: पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल हाती येत आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पुद्दूचेरी आणि तामिळनाडू सोडून कुठेच सत्ता परिवर्तन होताना दिसत नाही. पश्चिम बंगालमध्ये दीदीच येणार आहेत. ममता बॅनर्जींना हरवणं तितकसं सोपं नाही, असं राऊत म्हणाले. ममता बॅनर्जी या जिगरबाज नेत्या आहेत. त्यांनी भाजपचं आव्हान स्विकारलं. आव्हान स्विकारण्याची धमक त्यांनी दाखवली. त्याचं कौतुक केलंच पाहिजे. एवढंच नाही तर त्या दोन जागांवर लढल्या नाही. त्या एकाच जागेवर उभ्या राहिल्या. त्यांनी आव्हान स्वीकारलं. बंगालमध्ये पुन्हा दीदीच येतील याचा आम्हाला विश्वास आहे, असंही ते म्हणाले.बंगालमध्ये सत्ता परिवर्तन होताना दिसत नाही. बंगालमध्ये भाजपने मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीचं कौतुकच आहे. पण ममता बॅनर्जी यांना हरवणं तितकं सोपं नाही, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी काढला.

मेहनत आणि गुंतवणूक

तामिळनाडू आणि पुद्दुचेरी सोडून कुठेही सत्ता परिवर्तन होताना दिसत नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची सत्ता येईल. केरळमध्ये सत्ता बदल होताना दिसत नाही. दुपारपर्यंत निवडणुकीचा माहौल कमी होईल. बंगालमध्ये भाजपचा आकडा वाढत आहे. त्यांची मेहनत आहे. गुंतवणूकही आहे. या संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री बंगालमध्ये ठाण मांडून होते, असा चिमटा त्यांनी काढला.

चिंतनासाठीही ऑक्सिजन नाही

लोक कोरोनाने बेजार आहेत. बेड्स आणि ऑक्सिजन मिळत नाही. देशाची ही दशा कशाने झाली याचं चिंतन करायला हवं. पण चिंतन करायलाही ऑक्सिजन नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

कल ममता दीदींच्या बाजूने

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या 295 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. बंगालमधील जागांचे कल हाती आले असून त्यानुसार भाजपने बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. अवघ्या तीन जागा असलेल्या भाजपने 103 जागांपर्यंत उडी मारली आहे. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 175 जागांपर्यंत मजल मारली आहे. काँग्रेसला अवघ्या 3 जागा मिळताना दिसत आहे. ज्या डाव्या पक्षांनी बंगालमध्ये तीस वर्षे सत्ता उपभोगली. त्या बंगालमध्ये डाव्यांचा सुपडा साफ होताना दिसत आहे. त्यामुळे डाव्यांसाठी हा मोठा हादरा असल्याचं मानलं जात आहे. बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. केवळ काही जागांच्या फरकाने तृणमूल काँग्रेस पुढे आहे.

Latest News