ममतादिदि झाशीच्या राणीसारख्या – छगन भुजबळ


नाशिक | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असं दिसत आहे. पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विजयावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं तोंडभरून कौतुक केलं. ममतादीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
बंगालच्या निकालानंतर देशात भाजपविरोधी लाट निर्माण झाली आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. मै अपनी झाशी नही दुंगी असं झाशीच्या राणी म्हणाल्या होत्या. त्याच प्रमाणे ममता दीदीही मै अपना बंगाल नही दुंगी म्हणत लढल्या. तशी प्रतिज्ञाच त्यांनी केली होती, असं भुजबळ म्हणाले.
बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे 8 ते 10 मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही, असा टोला भुजबळ यांनी भाजपला लगावला आहे.
आसाम वगळता भाजपला कुठेच यश मिळालं नाही. भाजप विरोधात देशात प्रचंड लाट तयार झाली आहे, असं छगन भुजबळ म्हणाले. यावेळी त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीवरही भाष्य केलं. पंढरपूरचा निकाल गटतट आणि इतर स्थानिक राजकारणामुळे लागत आहे. त्यावरून देशाचा कल बांधता येत नाही, असंही भुजबळ म्हणाले.