पुणे महापालिके चे ग्लोबल टेंडर, लस खरेदीची तयारी,राजकीय आरोपाने खेळ रंगला

पुणे -… शहरात 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यातच, शहरातील अनेक नागरिकांचा लशीच्या दुसऱ्या डोसची मुदत संपलेली आहे. त्यामुळे नागरिक शहरभर प्रत्येक केंद्रावर लस शोधण्यासाठी भटकत असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून शहराला लस पुरविण्यात राज्य शासन आखडता हात घेत असल्याची टीका बिडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला

एका बाजूला शहरातील नागरिकांना करोना प्रतिबंधात्मक लस मिळत नसल्याने मोठा गोंधळ उडाला असतानाच; महापालिकेकडून ग्लोबल टेंडर काढून लस खरेदीच्या तयारीवरील राजकीय आरोप प्रत्यारोपांचा लोकल घोळ सुरू आहे. ही निविदा काढण्यासाठी राज्य शासनाने मुंबई महापालिकेला परवानगी दिली टेंडरसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून सांगण्यात येत आहे. या सर्वांकडूनच याबाबत वेगवेगळी माहिती देण्यात येत असल्याने नक्‍की हे टेंडर निघणार का आणि पुणेकरांची लसींची प्रतिक्षा संपणार का हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीत राहिला आहे.

या टेंडरसाठी कोणतीही परवानगी गरजेची नसल्याचे महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांचे मत आहे.तसेच, महापालिकेने लस खरेदीसाठी आर्थिक तरतूद केली असून राज्य शासन पालिकेस परवानगी देत नसल्याचा आरोप केला आहे. तर, बिडकर यांच्या आरोपाचा समाचार राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला असून शासनाला प्रस्ताव पाठवायचा असला तर तो आयुक्‍तांच्या माध्यमातून पाठवायचा असतो याचा विसर बिडकर यांना पडला असून त्यांना केवळ राजकारण सुचत असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

परवानगीची आवश्‍यकता नाही
लस खरेदी करण्यासाठी महापालिकेस राज्य शासनाच्या परवानगीची आवश्‍यकता नसल्याचे महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महापालिकेने लस खरेदी करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी प्रशासन मुंबई महापालिकेकडून माहिती मागवित असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले, तसेच शासनाकडून अद्याप त्याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचनाही आलेल्या नसल्याचे ते म्हणाले.

महापालिकेकडून शहराला लस उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सिरम संस्थेलाही पत्र देण्यात आले असून ग्लोबल निविदाही काढण्यात येणार असून प्रशासकीय पातळीवर त्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. लस शहराला मिळावी या उद्देशानेच सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात काही मतमतांतरे असतील तर त्यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
– मुरलीधर मोहोळ, महापौर