भारतीय सैन्य दलातील जवानाने रेल्वे प्रवासादरम्यान एक मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न,6 तासात जेरबंद

आठ वर्षीय मुलीच्या तोंडावर हात ठेवला व तिला उचलून रेल्वेतील बाथरुममध्ये नेले. मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच अवघ्या सहा तासात लोहमार्ग पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.प्रभू मलाप्पा उपहार (वय 33, रा.संगळ, पो. सुगमधूर, जि.बेळगाव, कर्नाटक) असे संशयित आरोपीचे नाव असून तो सध्या सैन्यदलात नाईक पदावर युनिट 182 झांशी येथे आहे.या घटनेत पीडित मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.रेल्वे प्रवासादरम्यान एका आठ वर्षीय मुलीवर भारतीय सैन्य दलातील जवानाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर त्या नराधमाने मुलीस चालत्या रेल्वेतून फेकून दिले. केवळ दैव बलवत्तर म्हणून ही मुलगी वाचली. ही घटना सोमवारी मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास गोवा निजामुद्दीन एक्सप्रेसमध्ये सातारा ते लोणंदच्या दरम्यान घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या दिशेने जाणारी गोवा-निझामुद्दीन ही रेल्वे नेहमीप्रमाणे सोमवारी मध्यरात्री 1. 30 वाजण्याच्या सुमारास सातारा रेल्वे स्टेशनवर आली. त्यानंतर ती लोणंदच्या दिशेने निघाली. सातारा ते लोणंद याच दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी, मिरज येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवा- निझामुद्दीन एक्सप्रेसने एक कुटुंब प्रवास करत होते. यामध्ये आई, वडील व त्यांची लहान तीन मुले होती. वडील हे नेव्हीतून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. तीन मुलांना घेवून ते दिल्लीला निघाले होते. रेल्वेमध्ये सोमवारी रात्री हे कुटुंब जेवण केल्यानंतर काहीवेळ जागेच होते. आठ वर्षीय मुलगी बर्थ वर झोपी गेली होती. मध्यरात्री दीडनंतर आरोपीने झोपी गेलेल्या आठ वर्षीय मुलीच्या तोंडावर हात ठेवला व तिला उचलून रेल्वेतील बाथरुममध्ये नेले. मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करताच मुलगी जागी झाली व ती ओरडू लागली.मात्र रेल्वेचा आणि बाहेरील वाऱ्याच्या आवाजामुळे त्या मुलीचा आवाज इतर कोणाला ऐकू गेला नाही. आरोपीने मुलीला शांत करत मुलीला ‘तुला आई, वडिलांकडे सोडतो.’ असे सांगत बाथरुममधून बाहेर दरवाजाजवळ आणले. त्यानंतर त्या मुलीला त्याने चालत्या रेल्वेमधून बाहेर फेकून दिले. त्यानंतर तो तेथून पसार झाला होता. मुलगी अचानक गायब झाल्यामुळे पहाटेपासूनच रेल्वेत खळबळ उडाली होती. तर मुलगी अंधार्या रात्री जीवाच्या आकांताने ओरडत होती.
सकाळी परिसरातील काही लोकांना जखमी अवस्थेत मुलगी आढळून आली. तिला उपचारासाठी सातारा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने दिलेल्या माहितीनंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ तपास यंत्रणा गतीमान केली. मुलीकडून आरोपीचे वर्णन घेतल्यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाई करत काही तासात आरोपीला अटक केली. ही कामगिरी पोलिस अधीक्षक वायसे-पाटील, अपर अधीक्षक कविता नेरकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मौला सय्यद यांच्या पथकाने केली.
आरोपीने पळ काढू नये म्हणून प्रत्येक थांब्यावर पोलिस तैनात करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील प्रत्येक मिनिटाची अपडेट घेत होते. यासाठी रेल्वे ब्लॉक करण्यात आली. भुसावळपर्यंत रेल्वेतून कोणालाही खाली उतरु दिले नाही. रेल्वे जिथे थांबत होती तेथे रेल्वे पोलिसांचा फौजफाटा प्रत्येक डब्याजवळ जावून चोख बंदोबस्त देत होता. सर्वांना आवाहन करुन सहकार्य करण्याची विनंती करत होते. यामुळेच संशयिताला भुसावळ रेल्वे स्टेशनवर पकडण्यात आले. मंगळवारी दुपारी संशयिताचा ताबा पुणे रेल्वे पोलिसांकडे दिला गेला.
प्रकार समजताच लोहमार्ग पोलिसांनी तपासाची सुत्रे गतिमान केली. आरोपी रेल्वेतून पळून जावू नये म्हणून तब्बल ३०० पेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मुलीने सांगितलेल्या वर्णनानुसार काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील एकाला मुलीने ओळखल्यानंतर अटक करण्यात आली. सहा तासात पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.
– सदानंद वायसे-पाटील, लोहमार्ग पोलिस अधीक्षक पुणे