पिंपरी चिंचवड मध्ये खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी धक्कादायक

images-2021-06-16T221322.588

पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. काही दिवसांच्या फरकाने टोळ्या आपले अस्तित्व दाखवत एकमेकांच्या टोळी सदस्यांवर हल्ले करतात. निगडी परिसरात अशाच दोन टोळक्यांमध्ये झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. 6 जून रोजी वाकड मध्ये परिसरातील वर्चस्ववादातून एका तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला.पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चोरी, जबरी चोरी यांसारख्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे म्हटले जाते. मात्र खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी मागील वर्षीपेक्षा अधिक आहे. त्यात गुन्हे उघडकीस येण्याची टक्केवारी देखील कमी झाली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.किरकोळ कारणांवरून देखील खुनासारखे गंभीर गुन्हे घडतात. मरकळ येथे दारू पिण्याच्या कारणावरून एकाचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून इंद्रायणी नदीत टाकल्याची घटना 1 जून रोजी घडली. त्याचबरोबर अगदी किरकोळ कारणांवरून खुनी हल्ले केले जातात. अशा गुन्हेगारांची आणि गुन्हेगारी मानसिकतेची मुस्कटदाबी करणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.मे महिन्यात पिंपरी चिंचवड शहरात खुनाच्या पाच घटना घडल्या. तर जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत 26 खून झाले आहेत. त्यातील 21 खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तर पाच खून अद्याप अनडिटेक्ट आहेत. मागील वर्षीय जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत 24 खून झाले होते.

खुनी हल्ल्याच्या नऊ घटना मे महिन्यात घडल्या. तर गेल्या पाच महिन्यात 53 खुनी हल्ले पोलीस दप्तरी दाखल आहेत. हीच संख्या मागील वर्षी 34 एवढी होती. सदोष मनुष्यवधाचे पाच महिन्यात दोन गुन्हे घडले आहेत.मे महिन्यात बलात्काराच्या नऊ घटना घडल्या आहेत. जानेवारी ते मे 2021 या कालावधीत बलात्काराच्या 67 घटना घडल्या आहेत. हा आकडा मागील वर्षी 54 एवढा होता. खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यात वाढ झाल्याचे आकडेवारी सांगत आहे. त्यातच शहरात पाच खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अजूनही मोकाट आहेत. त्या पाच खून प्रकरणातील धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्या आरोपींना पकडण्याचे तसेच गुन्हेगारीवर आळा घालण्याचे मोठे आव्हान सध्या पिंपरी चिंचवड पोलिसांपुढे आहे.

Latest News