स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार मुंडे भगिनींवर भाजपकडून अन्याय

औरंगाबादचे: डॉ. भागवत कराड यांची वर्णी लावण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांत प्रचंड अस्वस्थता आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात त्यांच्या वारसदार असलेल्या मुंडे भगिनींवर भाजपकडून अन्याय केला जात असल्याची चर्चा आधीपासूनच होत असताना बुधवारच्या मंत्रिमंडळ विस्ताराने त्यावर जणू शिक्कामोर्तबच करून टाकले आहे

, असे राजकीय जाणकारांना वाटते.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बहुजन समाजापर्यंत भाजपची पाळेमुळे पोहोचवणारे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारस खासदार प्रीतम मुंडे यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान जवळपास निश्चित होते, अशी चर्चा असतानाच ऐनवेळी त्यांचा पत्ता कट

औरंगाबादचे महापौरपद भूषवलेल्या डॉ. कराडांची गोपीनाथ मुंडे हीच खरी राजकीय ताकद आणि ओळख होती. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्तार करताना ‘सोशल इंजिनिअरिंग’ साधले असे म्हटले जात असले तरी त्यात राजकीय शह-काटशह देण्याचेच राजकारण झाल्याचे दिसते.

गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपमधील नेत्यांनीच हा पराभव घडवून आणल्याची टीका झाली होती. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री असताना पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले होते. तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावताना

पंकजा मुंडे यांना क्लिनचीट दिली होती खरी, परंतु प्रत्यक्षात चिक्की घोटाळ्याचे प्रकरण फडणवीस यांच्याच मुख्यमंत्री कार्यालयातून बाहेर पडल्याची चर्चा झाली आणि तेव्हापासून मुंडे-फडणवीस यांच्यात वितुष्ट निर्माण झाले.

पंकजा मुंडे यांनी ‘मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे,’ अशी इच्छा बोलून दाखवल्यानंतर तर पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी सुरेश धस यांच्याकडे बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगारांचे नेतृत्व सोपवण्यात आले. पंकजा मुंडे यांचा ऊसतोडणी कामगारांतील जनाधार कमी करण्यासाठीच ही चाल खेळण्यात आल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात झाली होती.

मोदी सरकारच्या नुकत्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांच्यानंतर सर्वात आघाडीवर नाव होते ते बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचे. मात्र ऐनवेळी प्रीतम मुंडे यांच्याऐवजी डॉ. भागवत कराड यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली

. भागवत कराड हे ओबीसी आणि वंजारी आहेत, हे खरे असले तरी भाजपला ‘खरा ओबीसी चेहरा’ गोपीनाथ मुंडे यांनी मिळवून दिला. तोच ‘खरा चेहरा’ केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातून डावलण्यात आला आणि एक प्रकारे राजकीय वितुष्टाचे उट्टे काढण्यात आले, अशी चर्चा आता सोशल मीडियावर होताना दिसू लागली आहे.

महाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली आहे. माझ्याकडे राज्याची सूत्रे द्या, चार महिन्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवून देऊ शकलो नाही तर राजकीय संन्यास घेईन, अशी गर्जना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती.

अशातच आता मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा ‘खरा ओबीसी चेहरा’ डावलून कराडांची वर्णी लावण्यात फडणवीस यशस्वी झाल्यामुळे त्यांचे खरे ओबीसी प्रेमही उजागर झाल्याची चर्चाही सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे यांचेच बोट धरून राजकारणात आलेले डॉ. भागवत कराड मुंडेंच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय झाले. डॉ. कराड यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली, तेव्हाही फडणवीसांकडून पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाला शह देण्यासाठी फडणवीसांनी ही चाल खेळल्याची चर्चा रंगली होती, परंतु डॉ. भागवत कराड हे माझेच नेतृत्वा मानून पुढे जात आहेत, असे सांगून पंकजा मुंडे यांनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता

. डॉ. भागवत कराड हे वंजारी समाजातील असले तरी राज्यातील ओबीसी किंवा वंजारी समाजात त्यांचा फारसा प्रभाव नाही आणि त्यांचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमताही नाही. त्यांच्या मर्यादा आहेत. त्यांना संसदीय राजकारणाचा कुठलाच अनुभव नाही. त्या उलट प्रीतम मुंडे यांची लोकसभेची ही दुसरी टर्म आहे. त्या लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी आहेत तर कराड हे राज्यसभेवर वर्णी लावलेले नेते आहेत.