मद्रास उच्च न्यायालयाने तामीळ सुपरस्टार विजयला तीव्र शब्दांत फटकारले…


केवळ पडद्यावरील हिरो ठरू नका. वेळेत आणि तत्परतेने टॅक्स भरा, असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला. मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी कर भरण्यास टाळाटाळ करू पाहणाऱ्या तामीळ सुपरस्टार विजयला तीव्र शब्दांत फटकारले.विजयने 2012 मध्ये ब्रिटनमधून एक लक्झरी कार आयात केली. सध्या त्या कारची किंमत 5 कोटी रूपयांच्या घरात असल्याचे समजते. त्या कारवरील आयात शुल्क विजयने भरले. मात्र, एन्ट्री टॅक्स भरण्यास त्याने नकार दर्शवला. त्या टॅक्सला आव्हान देणारी याचिका त्याने सादर केली. ती याचिका फेटाळून लावत न्यायालयाने विजयची कानउघाडणी केली. करचुकवेगिरीला घटनाबाह्य आणि देशविरोधी मानसिकता मानावे लागेल. विजयसारख्या अभिनेत्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. चाहते त्यांच्याकडे खरे हिरो म्हणून पाहतात, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. तसेच, विजयला 1 लाख रूपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम दोन आठवड्यांत तामीळनाडू मुख्यमंत्री कोविड फंडात जमा करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.