भाजपा सरकारच्या काळात अंगणवाडी सेविकांना वाटलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे, खरेदीची चौकशी करा


पुणे : “राज्यातील अंगणवाडी सेविकांना तत्कालीन भाजपा सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागामार्फत १ लाख ५ हजार महिलांना मोबाईल वाटप करण्यात आले होते. तेव्हापासून आज अखेर किमान ५० टक्के महिलांचे मोबाईल नादुरुस्त झाले आहेत. त्याचा येणारा खर्च संबधित महिलांना करावा लागत आहे.
तसेच हे मोबाईल महिलांना देण्यापूर्वी एका गोडाऊनमध्ये २ वर्ष पडून होते अशी माहिती समोर आली आहे आणि तेच मोबाईल आम्हाला देण्यात आले आहे. या मोबाईल खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या सर्व प्रकरणाबाबत पंकजा मुंडे यांची चौकशी पाहिजे,” अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमीम यांनी केली आहे.
राज्यातील अंगणवाडी महिला सेविकांना भाजपा सरकाराच्या काळात पंकजा मुंडे यांच्या मार्फत देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे होते. त्या खरेदीची चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी सोमवारी हवेली तालुक्यातील अंगणवाडी महिला सेविकांनी मोबाईल वापसी आंदोलन करत निषेध नोंदवला.
यावेळी अंगणवाडी सेविकांनी हे मोबाईल हवेली पंचायत समितीमधील अधिकार्यांना मोबाईल देऊन टाकले. या आंदोलनाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमीम यांनी केली.
तसेच यावेळी भाजपाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. “आमच्या महिलांना पगाराच्या निम्म्याहून अधिक खर्च मोबाईल आणि कागदपत्रा करता होतो. तो आम्हाला परवडत नाही. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही हवेलीमधील २५० मोबाईल अधिकार्यांना देऊन निषेध व्यक्त करत आहोत. आता या सरकारने आम्हाला उत्तम दर्जाचे मोबाईल आणि त्यामध्ये मराठीमध्ये अॅप द्यावे,” अशी मागणीही शुभा शमीम यांनी यावेळी केली.