महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बदल्या
पुणे : पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांची ठाणे येथे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर, दक्षिण विभागचे अतिरिक्त आयुक्तडॉ संजय शिंदे यांची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त आर. बी. डहाळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य शासनाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश सोमवारी रात्री काढले. यामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस उपमहानिरीक्षक अशा पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पिंपरी चिंचवड येथील उपायुक्त सुधीर हिरेमठ यांची पदोन्नतीने गुन्हे अन्वेषण विभागात उपमहानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले असून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
काही अधिकाऱ्यांना पदोन्नतीसह बदली दिली गेली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे cid येथे प्रमुख म्हणून अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेश कुमार यांची बदली करण्यात आली आहे तर, सीआयडीचे प्रमुख असलेले अतुलचंद्र कुलकर्णी यांची राज्य कारागृहाचे (सुधारसेवा) प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.