सत्ताधाऱ्यांचे‌ स्मार्ट सिटीत सॉफ्टवेअरच्या नावाखाली ३० कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्लॅनिंग, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांची जोरदार टीका

FB_IMG_1635048539049

सत्ताधाऱ्यांचे‌ स्मार्ट सिटीत सॉफ्टवेअरच्या नावाखाली ३० कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्लॅनिंग

  • भ्रष्टाचारामुळे बेअब्रू झालेल्या भाजपचा महासभेत कहर‌
  • राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षचे संजोग वाघेरे पाटील यांची जोरदार टीका

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीत झालेला भ्रष्टाचार नुकत्याच महानगरपालिकेच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी लक्षात आणून देत‌ त्याचा जाब विचारला. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी स्मार्ट सिटीत शंभर टक्के भ्रष्टाचार झाल्याचे सांगितल्यामुळे सत्ताधा-यांचा बुरखा फाटला. परंतु भ्रष्टाचारी कारभारामुळे बेअब्रू झालेल्या सत्ताधाऱ्यांनी याच सभेत स्मार्ट सिटीत सॉफ्टवेअरच्या नावाखाली ३० कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्लॅनिंग करून कहर केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे.

संजोग वाघेरे पाटील पुढे म्हणाले, महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्मार्ट सिटीच्या कामात झालेला भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभारावरून प्रशासनाला जाब विचारला. याच सभेत भाजपच्या अनेक नगरसेवकांनी भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. परंतु भ्रष्टाचारी प्रवृत्तीने पाच वर्षे महागरपालिका चालवणा-या सत्ताधा-यांना त्याचा काही फरक पडत‌ नाही.

या सभेत निवडणुकीच्या तोंडावर आणखी ३० कोटींचा घोटाळा करण्याचे प्लॅनिंग सत्ताधाऱ्यांनी केल्याचं समोर आलं आहे.‌ रस्ते खोदाई आणि केबल टाकण्याच्या कामात करोडोंचा चुराडा सत्ताधा-यांनी केलेला असताना आता रस्ते खोदाईच्या नियोजनाच्या नावाखाली सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याचे मोठे काम काढण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी ५ वर्षासाठी ३० कोटी इतका खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. याबाबतचा निर्णय चुकीच्या पध्दतीने उपसूचना सभा कामकाजात घुसवून घेण्यात आलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे या सभेप्रसंगी महानगरपालिकेत उपस्थित होते. पाच तास चर्चा झाल्यानंतर विषयपत्रिकवेरील विषय सुरू न करण्यामागे सत्ताधा-यांचे काहीतरी गौडबंगाल असल्याची शंका उपस्थित केली होती. ती रास्त ठरली असून सत्ताधा-यांनी या सभेत अशाप्रकारे चुकीचे प्रस्ताव करण्याचा खटाटोप केल्याचे समोर आले आहे. एकीकडे स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचारामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची राज्यभरात बदनामी होत आहे. सत्ताधारी भाजपला या सगळ्यावर उत्तरे देता येत नाहीत. दुसरीकडे या प्रकारे भाजपच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे शहर बदनाम होत असताना पिंपरी चिंचवडकरांच्या कररुपी तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार सुरूच आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, कशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‌‌‌‌‌‌वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात येणार आहे, असे संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले.

Latest News