भाजपने मतदारांचा विश्वासघात केला आहे….सचिन आहिर


भाजपने मतदारांचा विश्वासघात केला आहे…..सचिन अहिर
मुंबई प्रमाणे पिंपरी चिंचवडचा विकास करणार…..सचिन अहिर
पिंपरी (दि. 9 डिसेंबर 2021) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांनी 2017 साली मोठ्या विश्वासाने भाजपला महानगरपालिकेत एकहाती सत्ता दिली. या मतदारांचा भाजपने विश्वासघात केला आहे. आता भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आगामी निवडणूका शिवसेना आत्मविश्वासाने लढणार आहे असे प्रतिपादन शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी केले. पिंपरी चिंचवड शहरात देशभरातून नागरीक रोजगारासाठी स्थायिक झाले आहेत. त्यांना उत्कृष्ट दर्जाच्या सेवासुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कटिबध्द आहे. 2017 पासून या महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून विकासाला खीळ बसली आहे. शहरात स्मार्ट सिटीचे प्रकल्प राबवित असताना भाजपने भ्रष्टाचार केला आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. लवकरच त्यावर कारवाई होईल. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे या शहराचा आणखी वेगाने विकास करण्यासाठी मुंबई प्रमाणे पिंपरी चिंचवडचा विकास करणार असेही शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर म्हणाले.
गुरुवारी (दि. 9 डिसेंबर) पिंपरी महापालिकेत पत्रकारांशी संवाद साधताना अहिर बोलत होते. यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, महिला शहर संघटक ॲड. उर्मिला काळभोर, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर,
नगरसेवक अमित गावडे, शहर संघटक सचिन सानप तसेच गोपाळ मोरे आदी उपस्थित होते.