राजेंद्र जगताप यांची विकासकामे आमदार लेव्हलची : रुपालीताई ठोंबरे पाटील

पिंपरी-चिंचवडचा विकास खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे, याचे सर्व श्रेय अजित पवार यांना जाते. राजेंद्र जगताप यांनी केलेल्या कामांची यादी बघितली, तर त्यांनी नगरसेवकपदाच्या काळात केलेली कामे ही आमदार लेव्हलची कामे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी विकासकामे केली आहेत, असे गौरवोद्गार नुकत्याच मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नेत्या रुपालीताई ठोंबरे पाटील यांनी काढले.
त्यांनी पुढे सांगितले, की नुकताच आपण मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांनी विश्वास दिला. त्यामुळे राष्ट्रवादीची कार्यकर्ती म्हणून काम करण्यास आपण तयार आहोत. ज्यांच्यासोबत 14 वर्ष काम केले, त्या भावांना आपले सांगणे आहे, की या बहिणीला आपण ओळखू शकला नाहीत, पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की राष्ट्रवादीचे भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
महिलांच्या स्वाभिमानाचा विषय जपला पाहिजे. सोशल मीडियावर कमरेखालील विनोद करणाऱ्यांना अद्दल घडवली पाहिजे, यासाठी रूपालीताई चाकणकर आपण महिला आयोगाच्या माध्यमातून प्रयत्न करा. राजकारण माझ्यासाठी नवीन नाही. महिला सक्षम झाली पाहिजे, त्यासाठी तिला पुरुषांनी पाठिंबा दर्शवला पाहिजे. आम्ही महिला घर सांभाळून तारेवरची कसरत करतो. महिलांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.
भाजपने रोजगार देण्याऐवजी 2014 नंतर दहा कोटी रोजगार काढून घेतले. महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्राची परिस्थिती चांगली आहे. मतदान कोणाला आणि कशासाठी करतोय हे आपल्याला समजायला हवे, असेही त्या म्हणाल्या.

     

Latest News