कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व कार्यपद्धतींचा अंगीकार करणे, ई- गव्हर्नन्स, लोकाभिमुख कार्यालय या उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रथम क्रमांक

पिंपरी चिंचवड महानगरपलिका
माहिती व जनसंपर्क विभाग
 
पिंपरी, दि. १८ एप्रिल २०२२ :-    राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेत सन २०२१-२२ या वर्षाकरिता राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावांपैकी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना या वर्गवारीत महानगरपलिका गटात पिंपरी चिंचवड  महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावत  बहुमान मिळवला आहे.  कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना आणि कार्यपद्धतींचा अंगीकार, ई- गव्हर्नन्स तसेच लोकाभिमुख कार्यालय या उपक्रमांत पिंपरी चिंचवड महानगरपालिका अव्वल ठरली असून १० लाख  रुपये रोख,सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असा पुरस्कार राज्य शासनाकडून घोषित झाला आहे.
प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता आणि निर्णयक्षमता आणण्याकरता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा” ही योजना राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात आली. या अभियानांतर्गत सहभाग घेऊन स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट कल्पना आणि उपक्रम सुचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी आणि कर्मचारी यांना पारितोषिक देण्यात येणार असून राज्यस्तरावर प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत ४ वर्गवारीत पारितोषिक वितरीत केले जाणार आहेत.   या  स्पर्धेसाठी सर्व स्तरांवरून ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले होते.  या अभियानांतर्गत राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावांची छानणी तसेच परीक्षण राज्यस्तरीय निवड समितीने केले. पिंपरी चिंचवड महापालिकेने या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
पिंपरी चिंचवड महापालिकेने  प्रशासकीय कामकाजामध्ये नवनवीन संकल्पना आणि कार्यपद्धतींचा अंगीकार केला आहे. शिवाय लोकाभिमुख कार्यालयाचे व्यवस्थापन केले असून  नागरिकांना ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महापालिकेने केलेले काम राज्यात अव्वल ठरले असून त्यासाठी प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाल्याने शहराचा बहुमान वाढला आहे. नागरिकांचा सहभाग आणि योगदान यामुळेच हे शक्य झाले असल्याची भावना  असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी  व्यक्त केली. या  सहकार्याबद्दल आयुक्त पाटील यांनी नागरिकांचे  आभार मानले असून प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचा-यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.  
 
   जनता संपर्क अधिकारी

Latest News