चुकीच्या घडलेल्या घटनांचे “घड्याळ आता उलट फिरवणार आहात का? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

मुंबई :. . चुकीच्या घडलेल्या घटनांचे “घड्याळ आता उलट फिरवणार आहात का, असा सवाल सुप्रीम कोर्टाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. तसेच सुप्रीम कोर्टाचं काय चाललंय, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टामध्ये आज काहीतरी निकाल होईल हे अपेक्षित होतं. या वादावर आज कोणताच निर्णय न आल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या चालढकली बाबत माजी पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे

पण फार लांबलचक आणि गुंतागुंतीचा हा सगळा मामला आहे. आम्हाला खरे आश्चर्य आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या सुटीकालीन दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने जो आदेश दिला त्याचे. 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई प्रलंबित असताना मुख्यमंत्र्यांना शपथ देणे हेच चुकीचे होतं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड देखील होऊन गेलेली आहे. आता या घड्याळाचे काटे सुप्रीम कोर्ट उलटे फिरवणार आहे का ? संपूर्ण देशातल्या जनतेची अपेक्षा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत अभिप्रेत आहे त्याप्रमाणे न्यायदेवतेने न्याय दिला पाहिजे.

पण ते होताना दिसत नाही. पण उद्या त्या ठिकाणी मोठं बेंच बसेल आणि ते कायद्याप्रमाणे न्याय देईल आणि यातून राज्यातील परिस्थिती स्थिरस्थावर होईल, यापुढे असा घोडा बाजार चालणार नाही, असे मतदेखील चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यावर आता गुरूवारी सकाळी दहा वाजता सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत अनेक मुद्यांवर उहापोह झाला तरी उद्या न्यायालय काय निकाल देऊ शकते, याचा अंदाज ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केला आहे.

1)हे संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालय मोठ्या घटनापीठापुढे नेऊ शकते. त्यामुळे पुन्हा सर्व प्रकरणावर नव्याने सुनावणी सुरू होईल. परिणामी या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत शिंदे-फडणवीस सरकार त्यांचे रितसर काम पाहू शकेल

2)शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला द्यावे, अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयोगाने या मागणीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बाजू मांडण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाकडील सुनावणीला विधीमंडळातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय होईपर्य़ंत सर्वोच्च न्यायालय स्टे देईल किंवा सुनावणी पुढे सुरू ठेवा, असे सांगू शकेल. निवडणूक आयोगापुढील सुनावणीला स्टे मिळाला तर शिंदे गटाची कोंडी होऊ शकते. आगामी निवडणुकांत कोणते चिन्ह घेऊन लढायचे, असा पेच शिंदेपुढे येऊ शकतो.

3) शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेविषयीचा दुसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहे. शिंदे गटात शिवसेनेतील 40 आमदार सहभागी झाले. या आमदारांची फूट योग्य आहे की अयोग्य यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देणे अपेक्षित आहे. कारण शिंदे गटाने पक्षांतर्गत लोकशाहीचा भाग म्हणून या आमदारांनी आपला नेता बदलल्याचा दावा केला आहे. तर हे आमदार पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरल्याचा शिवसेनेचा दावा आहे. दोन तृतीयांश आमदार फुटल्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन होणे आवश्यक आहे का, यावरही सर्वोच्च न्यायालयाचे भाष्य अपेक्षित आहे.

4) शिवसेनेने मागणी केलेल्या सोळा आमदारांची अपात्रता कोणी ठरवायची? सर्वोच्च न्यायालयात हा आज मुद्दा उपस्थित झाला. शिंदे गटाच्या वकिलाने ही अपात्रता ठरवायचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचे आज आग्रहाने सांगितले. तर त्यावर न्यायालयाने अध्यक्षांनी दिलेल्या नोटिसला मुदतवाढ द्यावी म्हणून तुम्हीच (शिंदे गट) आमच्याकडे आला होता. आता तुम्हीच सर्वोच्च न्यायालयाला अधिकार नसल्याचे सांगत आहात, याकडे सरन्यायाधिशांनी लक्ष वेधले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेत फूट पडली असे मान्य केले तर या सोळा आमदारांची अपात्रतेचे काय होणार यावरही निकाल अपेक्षित आहे.

एकनाथ शिंदे सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीचे सावट आहे, असे मानण्यात येत आहे. मात्र शिंदे यांना सर्वोच्च न्यायालय राजीनामा देण्यास सांगू शकते का? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे सरकार गडगडेल का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.त्यावर अनेक विधिज्ञांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर शिंदे सरकारवर या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या परिणामाबाबत विविध मते व्यक्त होत आहेत.शिवसेनेने 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका दाखल केली आहे. या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. सर्वोच्च न्यायालय या आमदारांना अपात्र ठरवू शकते की नाही, यावर आज शिवसेना आणि शिंदे यांच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाला. शिंदे गटाचे वकिल हरिश साळवे यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर गदा आणू शकत नाही, असे साळवे यांचे म्हणणे होते.साळवे यांच्या याच म्हणण्याला सरन्यायाधीश रमण्णा यांनी आक्षेप घेतला. तुम्हाला अध्यक्षांनी नोटिस दिल्यानंतर तुम्हीच सर्वोच्च न्यायालयात आला. आम्ही त्या नोटिसवर निर्णय दिला. आता तुम्हीच म्हणता की आम्हाला अधिकार नाही.सरन्यायाधीशांच्या या टिप्पणीनंतर साळवे यांनी शिंदे गट हा शिवसेनेतून फुटून निघालेला नाही. त्यांनी फक्त आपला नेता बदलला आहे, असे मत व्यक्त केले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही तुमचे म्हणणे उद्या (गुरूवारी) सविस्तरपणे लेखी द्या, असा आदेश दिला.सरन्यायाधीशांच्या या टिप्पणीनंतर सर्वोच्च न्यायालय शिवसेनेत फूट पडली असून हे आमदार अपात्र आहे, असे घोषित करू शकते, अशी चर्चा सुरू झाली. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालय घड्याळाचे काटे उलटे कसे फिरवू शकेल, असा सवाल मांडला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या उद्याच्या सुनावणीत काय निकाल येणार याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष आहे.

Latest News