मराठ्यांना OBC कोट्यातून तसेच सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये…


ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- आज अटीवर कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास मान्यता दिली. उद्या सरसकटची मागणीही मान्य केली जाईल. त्यामुळे आमचा विरोध राज्य सरकारला आहे, असे सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीचे पुरुषोत्तम शहाणे पाटील यांनी म्हटले आहे.मराठा समाजाच्या मूक मोर्चात कुणबी समाजही सहभागी झाला होता. तेव्हा स्वतंत्र आरक्षणाची मागणी होती. त्यामुळे आम्ही एकत्र होतो. असेही शहाणे यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा काहीच विरोध नाही. मात्र मराठ्यांना OBC कोट्यातून तसेच सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, या मागणीसाठी सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीच्यावतीने आजपासून (ता. १०) आंदोलन सुरू करीत आहोत, असेही शहाणे म्हणाले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे. त्याकरिता आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यात यावी. तसेच ओबीसी ए व ओबीसी बी, असे वर्गीकरण करावे, अशी सूचना केली आहे. मात्र कृती समितीच्यावतीने यास विरोध करण्यात आला आहे.भूमिका आम्हाला मान्य नाही, असेही सर्व शाखीय कुणबी – ओबीसी आंदोलन कृती समितीच्यावतीन स्पष्ट करण्यात आले आहे. मराठा समाज आणि कुणबी समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे.राज्य सरकार मराठा आणि कुणबी या जातींमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही पुरुषोत्तम शहाणे पाटील यांनी काल (ता. नऊ) पत्रकार परिषदेत केला. समितीच्यावतीने आज Nagpur संविधान चौकात साखळी उपोषण केले जाणार आहे. त्यानंतर जिल्हानिहाय आंदोलने केली जातीलसरकारने दबावाला बळी पडून सरसकट प्रमाणपत्र देण्याचा आदेश काढल्यास आमरण उपोषण केले जाईल. निजमाकालीन नोंदीमध्ये कुणबी-मराठा असा उल्लेख असलेल्यांना व ते महाराष्ट्रातील रहिवासी असतील तर कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे. इतर राज्यातील रहिवाशांना प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे. ५२ टक्के लोकसंख्या ओबीसींची आहे. मात्र फक्त २७ टक्के आरक्षण मंजूर आहे. प्रत्यक्षात १७ टक्केच आरक्षण दिले जाते.मराठा समाजाला केंद्र सरकारने आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ करून स्वतंत्र आरक्षण द्यावे. यास आमची हरकत नाही, असेही कृती समितीच्यावतीने शहाणे पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला राजेश काकडे, अवंतिका लेकुरवाळे, बाबा तुमसरे, गुणेश्वर आरीकर, सुरेश गुडधे पाटील, सुरेश वर्षे, दादाराव डोंगरे, सुरेश कोंगे, प्रकाश वसू, विवेक देशमुख आदी उपस्थित होते.