राष्ट्ररक्षा बहुकुंडीय यज्ञाचे रविवारी पिंपरीत आयोजन

राष्ट्ररक्षा बहुकुंडीय यज्ञाचे रविवारी पिंपरीत आयोजन

पिंपरी, पुणे (दि.१८ ऑक्टोंबर २०२३) महर्षि दयानंद सरस्वती जन्मद्विशताब्दी महोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्ररक्षा बहुकुंडीय यज्ञाचे (हवन) रविवारी (दि.२२) आर्यसमाज पिंपरी नगर आणि पिंपरी गावातील शितळादेवी नवरात्रोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी गाव येथील शितळादेवी मंदिरासमोर आयोजन करण्यात आले आहे.

या वर्षी आर्यसमाजचे संस्थापक महर्षि दयानंद सरस्वती यांच्या जन्मद्विशताब्दी महोत्सव निमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवाचा शुभारंभ १२ फेब्रुवारी २०२३ रोजी दिल्ली येथे तालकटोरा स्टेडीयम मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झाला आहे. गेले वर्षभर देशभरात विविध सामाजिक संस्था व आर्यसमाज उत्सव साजरा करीत आहे.महर्षि दयानंद सरस्वती यांचा जन्म गुजरात मध्ये मोरवी संस्थानात टंकारा गावात १२ फेब्रुवारी १८२४ रोजी झाला होता.

महर्षि दयानंद हे वेदांचे प्रकांड विद्वान होते. तसेच तपस्वी व सत्यानुगामी आणि स्वराज्याचे पहिले पुरस्कर्ते, महिला उध्दारक, अनाथ व विधवा उध्दारक, जातीभेद निर्मूलक, संस्कृती रक्षक, आद्य क्रांतिकारक, वेदोध्दारक, शास्त्रार्थ महारथी, तर्कतीर्थ, महान योगी, योध्दा सन्यासी आणि अमर बलिदानी होते.

त्यांनी लिहिलेला अमर ग्रंथ सत्यार्थप्रकाश आजही मानवाला मार्गदर्शक ठरत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या महर्षिंनी प्रचलित तीन हजार विविध ग्रंथाचा अभ्यास करुन व वेदांच्या कसोटीवर तपासून हा अमर ग्रंथ तयार केला आहे.अशा बहुआयामी महापुरुषाच्या आणि पिंपरी गावातील १३५ वर्षे जुण्या शितळादेवी मंदिराच्या सन्मानार्थ राष्ट्ररक्षा बहुकुंडीय यज्ञ या कार्यक्रमाचे आयोजन आर्यसमाज पिंपरी व श्री शितळादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने रविवारी २२ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले आहे.

या यज्ञात २०० लोक सपत्नीक सहभागी होणार आहेत. पिंपरी गाव ग्रामस्थ आणि आर्यसमाजच्या कार्यकर्त्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी वाघेरे, सर्व ग्रामस्थ आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे. यज्ञात सहभागी होण्यासाठी मुरलीधर सुंदरानी – संरक्षक, सुरेंद्र करमचंदानी – अध्यक्ष, हरेश तिलोकचंदानी – मंत्री, सर्व पदाधिकारी आर्यसमाज पिंपरी तसेच शितळादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

Latest News