पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “विना वाहन वापर” धोरणास प्रथम पारितोषिक…

दिल्ली येथे आयुक्त शेखर सिंह यांचा गौरव; अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स 2023 मध्ये पुरस्काराचे वितरण

पिंपरी, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- २९ ऑक्टोंबर २०२३: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने “विना वाहन वापर” धोरणाची अंमलबजावणी करून नागरिकांसाठी सायकल मार्ग तसेच पादचारी मार्ग इत्यादी पूरक सुविधा पुरविल्याबददल १६ व्या शहरी वाहतूक विकास परिषदेत भारत सरकारचे शहरी विकास मंत्रालय सचिव मनोज जोशी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असून आज, दि. २९ रोजी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

या पारितोषिक वितरण सोहळयावेळी मनपा प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपअभियंता सुनील पवार, आयटीडीपीचे प्रांजल कुलकर्णी, डिझाईन शाळाचे संचालक आशिक जैन उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देशभरातील विविध शहरांमधून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबददल या कामगीरीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स 2023 करीता शहरी वाहतूक विभागांमध्ये नाविन्यपूर्ण विषयांवर काम करणाऱ्या महानगरपालिका, मेट्रो कार्पोरेशन, बस कार्पोरेशन यांच्याकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत विना वाहन वापर (NMT) धोरण तसेच त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेल्या कामांचा समावेश असलेल्या पिंपळे सौदागर परिसर, सांगवी- किवळे रस्ता, नाशिक-फाटा, वाकड रस्ता यावरील सायकल मार्ग तसेच पादचारी मार्ग इत्यादी पूरक सुविधा पुरविल्याबाबतची प्रवेशिका 25 ऑगस्ट 2023 रोजी शहरी विकास मंत्रालयाकडे सादर करण्यात आली होती. देशभरातील अनेक शहरांमधून आलेल्या प्रवेशिकांमधून पिंपरी चिंचवड शहराची निवड होऊन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वितरित करण्यात आले.

कोट…

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय आणि सरकारचे शहरी विकास विभागामार्फत वाहनमुक्त रस्ते, ज्ञानाची देवाणघेवाण अशा विविध उपक्रमांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यात येत आहेत. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने रेस टू झिरो मोहिमेसाठी वचनबद्ध असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने “विना वाहन वापर” योजना अंमलात आणली आहे. निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या भारताच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी यामार्फत प्रयत्न करण्यात येत असून शहरातील नागरिकांसाठी सायकल मार्ग तसेच पादचारी मार्ग इत्यादी पूरक सुविधा पुरविण्यासाठी आम्ही भर देत आहोत.

  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.