पिंपरी महापालिकेच्या पदपथांना अतिक्रमणांचा विळखा,पादचाऱ्यांना सेवा रस्त्यावरूनच चालावे लागते


पिंपरी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
कोट्यवधींचा खर्च करून तयार केलेले पदपथ विक्रेते, दुकानदारांच्या साहित्यांनी व्यापलेले आहेत. त्यामुळे पदपथांना अतिक्रमणांनी विळखा घातला असून, पादचाऱ्यांना सेवा रस्त्यावरूनच चालावे लागत असल्याचे चित्र आहे. अनेक पदपथांवर दुकानदार, विक्रेते आणि वाहनचालकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या पदपथांचा उद्देश सफल होत नसल्याचे चित्र आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात रस्ते, पदपथ विकसित करण्याचे धोरण अवलंबले आहे
. त्यासाठी सुस्थितीतील रस्ते तोडून नव्याने तयार केले जात आहेत. अधिक रुंदीचे पदपथ बनवून सायकल मार्गाची भर घातली जात आहे. मात्र, हे पदपथ, सायकल मार्ग एकसलग नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे
. सांडपाणी वाहिनीचे झाकण, पदपथावरील झाडे, वीजेचे खांब, बाके, कठडा, नामफलक असे अडथळे पार करीत ये-जा करताना पादचाऱ्यांना अक्षरश: अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. शहरातील सुस्थितीतील रस्ते तोडून प्रशस्त पदपथ, सायकल मार्ग तयार केले जात आहेत.