अरविंद एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी घेतले साहित्य लेखनाचे धडे 

पिंपरी, प्रतिनिधी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
 शालेय स्तरावरच कथा, कादंबरी, कविता, नाटक लेखनाचे धडे मिळाले, तर विद्यार्थ्यांकडून अगदी लहान वयात लेखनाला सुरुवात होऊ शकते, या उद्देशाने जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी क्रॉसवर्ड या पुस्तकालयात जाऊन ज्येष्ठ लेखिका संयुक्त राष्ट्र संघाच्या माजी सहाय्यक महासचिव लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी यांची भेट घेतली. 
           निमित्त होते संयुक्त राष्ट्रांच्या माजी सहाय्यक महासचिव आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी यांच्या ‘स्वॅलोइंग द सन इन मुंबई’ या पहिल्या कादंबरीचे प्रकाशनाचे. या कादंबरीचे प्रकाशन अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, मुख्याध्यापिका नीलम पवार आदी उपस्थित होते.
         लेखिका लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी यांनी विद्यार्थ्यांना साहित्य लेखन प्रक्रिया समजावून सांगितली. लेखना संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांची उकल केली. कादंबरीचा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. लेखिकेचे मौल्यवान विचार ऐकण्याची संधी मिळाली. लेखिकेने या पुस्तकाबद्दल सखोल तपशीलवार माहिती दिली. तसेच शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला.
         याविषयी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी सांगितले, की पुस्तकालयात जाऊन विद्यार्थ्यांची लेखिकेसोबत भेट घडवून आणण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तक लिहिण्याच्या आणि प्रकाशित करण्याच्या प्रक्रियेचे अंतर्दृष्टी ज्ञान देणे आणि विद्यार्थ्यांची लेखनविषयक भीती दूर करणे, तसेच जिद्दीने लेखन सुरू करण्यास प्रोत्साहित करणे हा होता.

Latest News