PCMC: मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोन सख्या भावांना आणि चोरीचे दागिने विकत घेणा-याला अटक…

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- )

भोसरी परिसरातून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोन सख्या भावांना आणि चोरीचे दागिने विकत घेणा-याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ तोळे सोने, दुचाकी असा चार लाख १५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. अक्षय राजू शेरावत (वय २३), अजय राजू शेरावत (वय २२, दोघे रा. हिंगणगाव, हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, अनिल अंकुश नानावत (वय ३९, रा. सणसवाडी, ता. शिरूर) याला चोरीचे दागिने खरेदी केल्याप्रकरणी अटक केली आहे.

भोसरीतील बोऱ्हाडेवाडीतून एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी हिसकावून नेले होते. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास करत असताना चोरीचे दागिने विकण्यासाठी दोघेजण खडी मशीन रोडवर येणार असल्याची माहिती  पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लाऊन अक्षय आणि अजयला ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.  त्यांच्याकडून चोरीचे दागिने अनिल नानावत याने खरेदी केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्याला देखील अटक केली. या कारवाईमुळे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील तीन आणि देहूरोड पोलीस ठाण्यातील एक असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत

Latest News